पिंपळगाव सोनारा येथे भगरीतून २५० महिला-पुरूषांना विषबाधा!
- ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू; सर्वांच्या प्रकृती चांगल्या!
साखरखेर्डा (अशोक इंगळे) – काल नवरात्र उत्सव सुरु झाला असून, पहिल्याच उपवासाच्या दिवशी महिलांनी भगर आणि भगरीच्या पिठापासून बनविलेल्या भाकरी खाल्ल्याने पिंपळगाव सोनारा येथील तब्बल अडिचशे महिला व पुरूषांना मळमळ व उलट्या होऊन विषबाधा झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यांना तातडीने साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणि खाजगी रुग्णालयात दाखल करून उपचार करण्यात आले आहेत. सर्व रुग्णांची प्रकृती चांगली असून, महिलांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.
पिंपळगाव सोनारा येथील नारायण ठोसरे आणि रेखा ठोसरे यांना प्रथम मळमळ व उलट्या झाल्या. पहिला उपवास असल्याने त्यांनी भगरीच्या पिठाची भाकरी आणि आमटी खाल्ल्याने मळमळ होऊन उलटी झाली. त्यानंतर गावातील इतर महिला व पुरूषांनासुध्दा त्याच पध्दतीने मळमळ आणि उलटी झाल्याने गावात खळबळ उडाली, व विषबाधेची ही घटना उघडकीस आली. व अनेकांना सरकारी तसेच खासगी रूग्णालयांत हलवण्यात आले. आज सकाळी सहा रुग्णावर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी तातडीने सर्वांवर उपचार सुरू केले. तर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या नागरिकांनी उपचार घेतले आहेत.
किराणा दुकानातून भगर घेतांना मुदत संपलेल्या तारखेची भगर घेऊ नये. याबाबत सर्व किराणा व्यापार्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
– डॉ. संदीप सुरुशे, वैद्यकीय अधिकारी, साखरखेर्डा
या अगोदर बिबी ग्रामीण रुग्णालय अंतर्गत सोमठाणा येथे महाशिवरात्री दिवशी भगरीतून विषबाधा झाली होती. आजही अनेक किराणा दुकानातून मुदत संपल्यानंतर भगरीची विक्री सुरू आहे. तर मुदत संपल्यानंतर भगरीचे पिठ तयार करून विकले जात आह. बालाजी किराणा दुकानातून या अगोदर मुदत संपलेल्या भगरीची विक्री होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. कालही नारायण ठोसरे यांनी याच दुकानातून भगर व पिठ घेतले होते. त्यामुळे ग्राहकांनी उपवास करीत असताना भगर व पिठ खाणे टाळावे. यावेळी संगीता राजपूत, मिना राजपूत, लक्ष्मी राऊत, जगन राऊत, अनिता भागवत ठोसरे, अनिता रघुनाथ ठोसरे, चंद्रकला तेजराव पळसकर, गिता लक्ष्मण भागिले, चंद्रभागाबाई पळसकर, सविता बिनोरकर, शशिकला नारायण ठोसरे, लक्ष्मी भागवत ठोसरे, नंदाताई सुधाकर ठोसरे, दर्शन ठोसरे, प्रसाद ठोसरे यांच्यासह अनेकांवर सद्या उपचार सुरू आहेत. विषबाधाग्रस्त महिला व पुरूषांची संख्या रात्रीपर्यंत अडिचशेच्यावर गेली होती. चक्कर येणे, मळमळ होणे, उलट्या होणे हे प्रकार सुरू आहे . खाजगी रुग्णालयात संख्या वाढली आहे.