घरासमोर सुंदर, गोंडस नवजात चिमुकली ठेवून निदर्यी माता पळून गेली
- टाकरखेड भागिले येथे दोन महिन्याचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक सापडल्याने खळबळ
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – तालुक्यातील टाकरखेड भागिले येथे अज्ञात आरोपीने घरासमोर स्त्री जातीचे अर्भक बेवारस सोडून पळ काढण्याची घटना (ता. ३) तालुक्यातील टाकरखेड भागिले येथे सकाळी उघडकीस आली. दरम्यान, पोलिस आणि ग्रामीण रुग्णालय यांनी सदर बाळ जालना स्त्री रुग्णालयात दाखल केले आहे. विशेष म्हणजे, ही चिमुकली अतिशय सुंदर व गोंडस असून, पाहताक्षणी ती सर्वांना भुरळ घालते. कुणाला नकोशी झाल्याने किंवा काही अनैतिक प्रकारातून तिचा जन्म झाला आहे का, त्यासाठी त्या निदर्यी माता-पित्याला तातडीने अटक करण्याची गरज समाजातून वर्तवली जात आहे.
सविस्तर असे, की टाकरखेड भागिले येथील पोलीस पाटील यांनी त्यांच्या मोबाईल वरून ११२ कॉल डायल करून माहिती दिली, की अज्ञात आरोपीने दोन महिन्याचे स्त्री जातीचे जीवंत अर्भक टाकरखेड भागिले येथील बबन नामदेव खरात यांच्या घरासमोर रात्रीला कोणीतरी आणून टाकले. सकाळी चिमुकल्याच्या आवाजाने सदर घटना उघडकीस आली. तेथे जमलेल्या लोकांना सकाळी सदर बाळ कोणाचे आहे, याबद्दल विचारणा केली असता कोणाला काहीच माहित नाही, असे निदर्शनास आले. पोलिसांनी सदर अर्भक ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून जालना स्त्री रुग्णालयात दाखल केले. याबाबत मेहुणाराजा येथील पोलीस पाटील नारायण देवराव दहातोंडे (वय ४५) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. सदर अर्भक कुणी बेवारस टाकून दिले, याबाबत ठाणेदार संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेडकॉन्स्टेबल कलीम देशमुख तपास करीत आहेत.