राष्ट्रवादीच्या शनिवारपासून सलग तीन दिवस पुण्यात मुलाखती
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभेची जोरात तयारी!
– पक्षाध्यक्ष शरद पवारांसह २३ जणांच्या पार्लमेंटरी बोर्डाची घोषणा
– खा. सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड यांचा समावेश
बुलढाणा/मुंबई (बाळू वानखेडे) – राज्यातील विधानसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षही आता जोमाने कामाला लागल्याचे दिसून येत आहे. पक्षाकडून काल, दि. ३ आक्टोबर रोजी पक्षाध्यक्ष शरद पवारांसह २३ जणांच्या पार्लमेंटरी बोर्डाची घोषणा करण्यात आली. सदर बोर्डामध्ये पक्षाच्या कार्याध्यक्षा खा. सुप्रिया सुळे यांच्यासह जितेंद्र आव्हाड, जयदेव गायकवाड यांनाही स्थान देण्यात आले आहे. पक्षाकडे उमेदवारी मागितलेल्या इच्छुकांच्या मुलाखती येत्या शनिवारपासून तीन दिवस गुलटेकडी पुणे येथे घेण्यात येणार आहेत.
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहत आहेत. सर्वच प्रमुख पक्ष निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागले आहेत. जागा वाटपाचा घोळ ‘मेळ’ पांगवतो की काय, अशीही भीती व्यक्त केली जात असतानाच, आपल्या पक्षाचे काम मागे राहू नये, म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पक्षीय दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची समजल्या जाणार्या पार्लमेंटरी बोर्डाची (सांसदीय मंडळ) घोषणा केली आहे. यामध्ये अध्यक्ष शरद पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सुप्रिया सुळे, राजेश टोपे, अनिल देशमुख, जयप्रकाश दांडेगावकर, श्रीमती वंदना चव्हाण, रोहित पवार, शशिकांत शिंदे, नरेंद्र वर्मा, नसीम सिद्दिकी, श्रीमती रोहिणी खडसे, राज राजापूरकर, अरुण गुजराथी, जितेंद्र आव्हाड, बाळासाहेब पाटील, श्रीमती फौजिया खान, प्राजक्त तनपुरे, सुनील भुसारा, जयदेव गायकवाड, श्रीमती विद्या चव्हाण, श्रीमती राखी जाधव व महेबूब शेख यांचा समावेश आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे अर्ज केलेल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती निसर्ग मंगल कार्यालय, गुलटेकडी पुणे येथे शनिवारपासून तीन दिवस घेण्यात येत आहेत. यामध्ये मराठवाडा विभाग ५ ऑक्टोबर, विदर्भ विभाग ६ ऑक्टोबर, व उत्तर महाराष्ट्र विभाग ७ ऑक्टोबररोजी मुलाखती घेण्यात येणार आहेत. यामध्ये मराठवाडा विभागातील मुलाखतीस खा. बजरंग सोनवणे, विदर्भ विभाग खा. अमर काळे व उत्तर महाराष्ट्र विभाग खा. नीलेश लंके व खा.भास्कर भगरे उपस्थित राहणार आहेत.