शिवसेनेच्या मोर्चाने मेहकर दणाणले; ‘प्रताप’गडाला हादरे!
- सिद्धार्थ खरात यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन; मतदारसंघात शिवसेनेची लाट कायम असल्याचे स्पष्ट!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – राज्यातील एकनाथ शिंदे सरकारविरोधत शेतकरी, कष्टकरी, महिला, तरूण, नोकरदारांच्या विविध मागण्यांसाठी रेकॉर्डतोड असा विक्रमी परिवर्तन मोर्चा शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते तथा विधानसभेचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात मेहकर येथील तहसीलवर धडकला. या मोर्चातून विधानसभेचे संभाव्य उमेदवार सिद्धार्थ खरात यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले असून, या मतदारसंघात शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची असलेली लाट कायम असल्याचे दिसून आले. तसेच, या मोर्चामुळे लोकसभेनंतर ‘प्रताप’गडाला पुन्हा एकदा हादरे बसल्याची राजकीय चर्चा रंगली होती.
शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, सोयाबीनला ८ हजार, कपाशी व तुरीला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव देण्यात यावा, अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकांचे नुकसान झाल्यामुळे प्रतिएकर २४ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, मेहकर शहरातील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावावा, बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात यावी, शेतकर्यांच्या पीकविमा तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करावा, शेतीला दिवसा १२ तास वीजपुरवठा देण्यात यावा, घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा, जागतिक पर्यटनस्थळ असलेल्या लोणार विकास आराखड्याची रखडलेली कामे पूर्ण करावी, महिलांना सुरक्षा देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्यात यावे, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून न्याय देण्यात यावा, घरकूल योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना तत्काळ लाभ देण्यात यावा, जागतीक पर्यटनस्थळ लोणार विकास आराखड्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावी, मेहकर लोणार तालुक्यातील शेतरस्ते तात्काळ तयार करुन देण्यात यावे, स्मशान, दफनभूमीसाठी जागा उपलब्ध करुन द्याव्या, कंत्राटी कर्मचार्यांना सेवेत नियमित करावे, जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मागण्यासाठी हा मोर्चा जानेफळ रोडवरील शिवसेना कार्यालयापासून निघून तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी या मोर्चात शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हा प्रमुख प्रा. आशीष रहाटे, शहरप्रमुख किशोर गारोळे, जिल्हा संघटक गोपाल बछिरे, दिलीप वाघ, अॅड. सुमित सरदार, माजी नगराध्यक्ष अशोक अडेलकर, अॅड. आकाश घोडे, ऋषिकेश जगताप, संदीप गवई, शुभम वानखेडे, अमोल मोरे, दीपक मापारी, संजीवनी वाघ, गजानन जाधव, निंबाजी पांडव, श्रीकांत मादनकर, बद्री बोडखे, यासह शिवसेना महिला आघाडी, युवासेना, पदाधिकारी सहभागी झाले होते.
यावेळी शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी निष्क्रीय शासनाचा आपल्या भाषणातून समाचार घेवून गद्दारांना धडा शिकवून मेहकर मतदारसंघावर भगवा फडकवा, असे आवाहन मोर्चेकर्यांना केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत यांनीसुद्धा शासनाचा आमदार, खासदारांचा आपल्या भाषणातून समाचार घेत, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांचे प्रश्न मांडून आता हे प्रश्न सोडविण्यासाठी आपले उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडीचे सरकार आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा, असे आवाहन केले. मेहकरचा आजचा मोर्चा रेकॉर्ड तोड व विक्रमी झाला. या मोर्चातून सिद्धार्थ खरात यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केल्याचे दिसून आले.
या मागण्यांसाठी निघाला मोर्चा!
शेतकर्यांच्या मालाला योग्य तो हमीभाव मिळावा, त्याचबरोबर शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, मेहकरमधील एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लावून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी पाऊल उचलावे, अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार विकास आराखड्याची रखडलेली कामे त्वरित पूर्ण करावीत, मेहकरचे बस स्थानक पाठीमागच्या पंधरा वर्षांपासून मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहे, त्याचे काम झाले पाहिजे. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि कंत्राटी कामगारांना सेवेत सामील करावे या सर्व मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.