पक्षाने तिकीट न बदलल्यास फटका बसणार; नाराजांनी दिला पक्षाला इशारा!
- शेवगाव-पाथर्डीत भाजपातील दुफळी चव्हाट्यावर; नाराज नेत्यांनी घेतला निर्धार मेळावा!
शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – येत्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागून विधानसभेसाठी पडघम वाजतील. आताच आचारसंहितापूर्वी इच्छुक उमेदवारांसह सध्याचे विद्यमान आमदार आपापल्या मतदारसंघांमध्ये सर्व ताकदीनिशी प्रचार फेर्यांमध्ये तसेच शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत. येथे एक दोन दिवसात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या पहिल्या याद्या जाहीर होणार असल्याचे समजते, त्यामुळे आता विद्यमान आमदारांसह इच्छुकांनीदेखील आपल्या मतदारसंघांमध्ये चांगलीच मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येत आहे. अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या अनपेक्षित लागलेल्या निकालामुळे प्रत्येक मतदारसंघांमध्ये अनेक इच्छुक सध्याच्या विद्यमान आमदारांविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास सज्ज झाले आहेत. तर काही ठिकाणी विद्यमान आमदारांना स्वपक्षातूनच मोठे आव्हान पाहायला मिळत आहे.
शेवगाव पाथर्डी मतदारसंघामध्येदेखील भाजपाचे विद्यमान आ. असलेल्या मोनिका राजळे यांना स्वपक्षातूनच आव्हान देण्यास सुरुवात झाली असून, भाजपातील अरुण मुंडे तसेच गोकुळ दौंड यांनी राजळेंविरुद्धच बंड पुकारले असून, पक्षाकडे राजळेऐवजी दुसर्या कोणत्याही उमेदवाराला उमेदवारी देण्याची मागणी लावून धरली आहे. जर विद्यमान आमदारांना पक्षाने पुन्हा या मतदारसंघातून संधी दिल्यास पक्षाला मोठा फटका बसू शकतो, हक्काची जागा गमवावी लागेल, असे मुंडे व दौंड यांनी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. गोकुळ दौंड तसेच भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी पाथर्डीमध्ये निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने आ.राजळे विरोधकांना एकत्र करत, या निवडणुकीत पक्षाने उमेदवार बदलावा, अशी जोरदार मागणी केली. यावेळी मतदारसंघातून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित राहिले होते. यावेळी मुंडे व दौंड यांनी पाथर्डी पाथर्डी शहरातून रॅली काढत मोठे शक्तीप्रदर्शन देखील केले.
यावेळी माध्यमांशी बोलताना म्हणाले की, आ. राजळे या आमच्या बहिणीप्रमाणे आहेत, त्या दोन वेळेस आमदार झाल्या आहेत. पक्षाने त्यांना ऐनवेळी उमेदवारी दिली तरी प्रामाणिकपणे त्यांना साथ दिली, पण आता त्यांनी थांबून आपल्या भावांचा विचार करावा. गेले अनेक वर्ष शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात तीन प्रस्थापित कारखानदार कुटुंबाचे वर्चस्व असून, इतर कार्यकर्त्यांना सत्तेमध्ये कोणतीही संधी मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. मात्र आता जनताच जागृत झाली असून, त्यांनी प्रस्थापितांना नाकारून नव्या उमेदवारांना संधी देण्याचे ठरवले आहे. आणि, त्यासाठीच मतदारांनी निर्धार मेळावा आयोजित केला असल्यास यावेळी बोलताना सांगितले.
सर्व पदे एकाच विशिष्ट कुटुंबाला का?; मुंडेंचा सवाल!
मतदारसंघातील ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी या सर्व पदांसाठी एका विशिष्ट कुटुंबांनी सर्व पदे आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न आतापर्यंत केला आहे. त्यामुळे या प्रस्थापितांविरोधात जनतेमध्ये मोठा रोष असल्याने निर्धार मेळाव्याला शेवगाव पाथर्डी तालुक्यातील भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, सरपंच नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित असल्याचे यावेळी अरुण मुंडे यांनी सांगितले. तर आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितलेली असून पक्षाचे वरिष्ठ नेते निश्चितपणे आमच्या उमेदवारीबद्दल विचार करतील. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जर उमेदवारी दिली नाही तर त्याबाबत विचार केला जाईल. आम्ही भारतीय जनता पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहोत. निवडणुकीत आम्ही पक्षाचे काम करू, मात्र उमेदवारी न बदलल्यास जनता विद्यमान लोकप्रतिनिधीला पराभूत करेल, असे दौंड यांनी सांगितले.
पाथर्डी, शेवगावमध्ये भाजपातच मोठी दुफळी!
दरम्यान, निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षात शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात मोठी दुफळी निर्माण झाल्याचे आता स्पष्टपणे समोर आले असून, उमेदवारी बाबत वरिष्ठ पक्ष नेतृत्वासमोर मोठे आव्हान असल्याचे सध्या तरी चित्र आहे. मतदारसंघात कुठलेही भरीव विकासकामे या पाच वर्षात न झाल्याने व शेवगाव शहर पाणी योजना रखडल्यानेदेखील मतदारांमध्ये भाजपासह विद्यमान आमदारांवर प्रचंड नाराजी असल्याचे कार्यकर्त्यांनी बोलून दाखवले.