सूजय विखेविरोधात लोकसभा लढलो म्हणूनच माझ्या मुलीची बदनामी!
- वादग्रस्त पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांचा गंभीर आरोप
– पूजाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे; यूपीएससीने कुणाच्या तरी दबावाखाली कारवाई केली!
नवी दिल्ली (प्रतिनिधी) – राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा सुजय विखेविरोधात मी अहमदनगर (दक्षिण)मधून लोकसभा निवडणूक लढवली. म्हणूनच माझी मुलगी पूजा खेडकरची बदनामी करण्यात आल्याचा आरोप माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत केला. पूजाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. यूपीएससीने कोणाच्यातरी दबावाखाली कारवाई केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
पत्रकार परिषदेत वादग्रस्त माजी सनदी अधिकारी पूजा खेडकरचे वडील तथा राज्याचे माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप खेडकर म्हणाले, की माझ्याविरोधात या प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला होता, म्हणून या अगोदर प्रसारमाध्यमांसमोर आलो नाही. माझी मुलगी पूजा खेडकरवर करण्यात आलेले सर्वच आरोप खरे नाहीत. पूजाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या मुलीला जो त्रास झाला तो माझ्यामुळे झाला. प्रस्थापितांना मी निवडणूक लढू नये, असे वाटत होते. म्हणून या नेत्यांनी जाणूनबुजून त्रास दिला असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, विखे पाटील यांच्या मनामध्ये राग होता. त्यांच्याकडे महसूल खाते आहे म्हणून त्यांनी त्यांचा शासकीय अधिकार्यांवर प्रभाव पडला आहे. मात्र, नैसर्गिक न्याय आम्हाला मिळायला पाहिजे होता. तो मिळाला नसल्याचा आरोपही खेडकर यांनी केला.
यूपीएससीने जे आरोप केले आहेत. त्यात म्हटले की पूजा खेडकर यांनी स्वतःच नाव बदलले. परंतु तिने नाव बदलले नसल्याचा दावा त्यांनी केला. यूपीएससीने कोणाच्यातरी दबावाखाली कारवाई केली असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. पूजा खेडकर ही वंजारी आहे. तिचे ओबीसी प्रमाणपत्र खोटे नाही, त्या वर्गवारीत तिने परीक्षा दिली ते योग्य असल्याचे ते म्हणाले. पर्सन विथ बेंचमार्कमध्ये ३०-४० आजार आहेत. अम्लोपिया हा आजार पूजा खेडकरला आहे. पीएच वर्गवारीत हा आजार २०१८ ला आला. दोन्ही वर्गवारीचे अटम्प्ट वेगवेगळे असल्याचे खेडकर यांनी सांगितले.