वर्धा (प्रकाश कथले) – शहरालगतच्या पिपरी मेघे येथील तुळजाभवानीच्या मंदिरावर झेडा लावण्याकरीता मंदिराच्या कळसावर चढलेल्या तिघांचा वीजप्रवाहाचा धक्का लागून एकाचवेळी मृत्यू झाला. गावातील तीन भाविकांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. वीजेचा धक्का लागल्याने दुर्देवी मृत्यू झाल्याचीही घटना आज सकाळी शहरालगतच्या पिपरी(मेघे) येथे घडली. या घटनेत एकाचा जागीच तर दोघांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मरण पावलेल्यांत पिपरी मेघे येथील अशोकराव सावरकर (वय ५५), बाळू शेर (वय ६०) आणि सुरेश झिले (वय ३३) यांचा समावेश आहे. ऐन रक्षाबंधनाच्या दिवशी हे अघटित घडले. त्यामुळे गावच सुन्न झाले. शहरालगतच्या पिपरी(मेघे) येथे तुळजाभवानी मातेचे मंदिर आहे. आज सकाळी आठ वाजता मंदिराच्या कळसावर झेंडा लावण्यासाठी गावातीलच अशोकराव सावरकर, बाळू शेर आणि सुरेश झिले (वय ३३) असे तिघेजण मंदिरावर चढले होते. यावेळी २५ फूट उंचीच्या लोखंडी खांबांवर झेंडा लावण्याचा ते प्रयत्न करीत होते. दरम्यान, त्या लोखंडी खांबाचा तोल सुटला आणि तो लगतच्या ३३ केव्हीच्या वीज तारांवर पडला. लोखंडी खांबाचा वीजतारांना स्पर्श होताच तिघांनाही वीजप्रवाहाचा जोरात धक्का बसला. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचाराकरीता नेण्यात आले. पण एकाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तर दोन जणांवर उपचार सुरू केले पण त्यांनी उपचारांना दाद न देता शेवटचा श्वास घेतला.
रक्षाबंधनाच्या दिवशीच घडलेल्या या घटनेमुळे पिपरी मेघे गावावरच शोककळा पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहे.
——————-