उदयनगर, ता. चिखली (जिया काझी) – हिंदू संस्कृतीमध्ये पवित्र समजल्या जाणार्या श्रावण महिन्यानिमित्त सोमप्रदोष पर्वणीचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद मातृशक्ती दुर्गावाहिनी अमडापूर प्रखंडाच्यावतीने काल पार्थिव शिवलिंग पूजन तथा रुद्राभिषेक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अमडापूर येथील जगदंबा नागरी पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी म्हणून आ. श्वेताताई महाले यांची उपस्थिती होती. या धार्मिक आयोजनात आ. महाले यांनी पार्थिव शिवलिंगाचे विधीवत पूजन केले.
यावेळी व्यासपीठावर मातृशक्ती अमडापूर खंड संयोजिका दीपाली धुंदाळे, दुर्गावाहिनी प्रखंड संयोजिका दीपाली देशमुख, दुर्गावाहिनी खंड संयोजिका वनिता बगाडे, उदयनगर खंड संयोजिका सारिका नसवाले उपस्थित होत्या. रुद्र अभिषेकाच्या पूर्वी मातृशक्ती विदर्भ प्रांत सहसंयोजिका फुलवंती कोरडे यांनी कार्यक्रम घेण्यामागचा हेतू सांगितला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दुर्गा वाहिनीच्या जान्हवी धुंदाळे, सूत्रसंचालन श्रुष्टी तिडके तर आभार प्रदर्शन वेदिका पुरंदरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शारदा आदबाने, मीना जयस्वाल, ललिता खंदलकर, सविता जाधव, सुनिता दुसाद, मीना निकम, वैशाली शेळके, सुनिता पाखरे यांच्यासह मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
उपक्रमाचे केले आ. श्वेताताईंनी कौतुक!
पवित्र श्रावण मासानिमित्त विश्व हिंदू परिषद दुर्गा वहिनी मात्रूशक्तीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या धार्मिक उपक्रमामध्ये सहभाग नोंदवत असताना आ. श्वेताताई महाले यांनी या आयोजनाचे कौतुक केले. या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांमध्ये आध्यात्मिक व सात्विक शक्ती वाढण्यास निश्चितच मदत होईल व त्याचा लाभ पूर्ण कुटुंबाला होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.