वर्धा लोकसभा मतदारसंघातील मतदारांनीच हाती घेतला त्यांना भेडसावणार्या समस्यांचा मुद्दा!
वर्धा (प्रकाश कथले) – वर्धा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस तसेच महाविकास आघाडीच्यावतीने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तसेच आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांच्यातच खरी लढत होणार,हे स्पष्ट झाले आहे. ही निवडणूक भाजपच्या वतीने मोदींचे नेतृत्त्व तसेच महाविकास आघाडीच्यावतीने बेरोजगार युवक, महागाई, शेतकर्यांचे शेतमाल भावाबाबतचे शोषण, पेट्रोल डिझेल तर घरगुती गॅसची झालेली दरवाढ,त्यातून सामान्य जनतेच्या वाढलेल्या समस्यांच्या मुद्द्यांची मांडणी करीत लढविली जात आहे. पण या निवडणुकीत मतदारांनीच त्यांना भेडसावणार्या समस्यांचा मुद्दा हाती घेतल्याचे दिसते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातला हा स्वातंत्र्याच्या राजधानीत दिसलेला शुभशकून आहे.
मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस संपलेत,याचे हे द्योतक आहे. गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेलचे वाढलेले भाव, विविध वस्तूंची महागाई, शेतमालाला न मिळणारा भाव, खतांच्या,बियाण्यांसह कीटकनाशकाच्या वाढलेल्या किंमती, मागील लोकसभा निवडणुकीत मतदारांना दाखविलेल्या सुखस्वप्नांची झालेली राखरांगोळी, बेरोजगारी, जिल्ह्यात न आलेला एकही नवीन उद्योग, यासह शेतकर्यांच्या समस्यांनी पिचलेल्या सर्व शेतकर्यांसह मतदारांनीच त्यांच्या समस्यांचा मुद्दा ऐरणीवर आणत मतदान करण्याचे ठरविल्याचे दिसत असल्याने सत्तेच्या स्वप्नरंजनाचे दिवस संपल्यात जमा झाल्याचे दिसत आहे. तुमचे मेळावे, भाषणे, आश्वासने खुंटीवर ठेवा, पण मागील वर्षांत काय केले ते सांगा, असे मतदार सुनावू लागल्याने सत्तेतल्यांना घाम फुटायला लागला आहे. त्यातच सोशल मीडिया प्रभावी व्हायला लागला आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघात धार्मिक तेढ,हा मुद्दा कधी नव्हताच.गांधीजी, विनोबाजींच्या संस्कारातून येथील जनतेच्या विविध पिढ्यांनी या मुद्याला निवडणुकीच्या दरम्यानच काय,पण इतरवेळीही पाळेमुळे रुजवूच दिली नाही. पण या निवडणुकीत वेगळेच वातावरण दिसत आहे. मतदारांनीच त्यांच्या दररोज भेडसावणार्या समस्यांचा मुद्दा निवडणुकीचा मुद्दा केल्याचे दिसत आहे.
या निवडणुकीत उमेदवारांची संख्या थोडी वाढली आहे.पण खरे राजकीय घमासान भाजप तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांतच आहे. मतदारसंघाच्या विकासाकरीता विद्यमान खासदारांनी काय केले, हे विचारले जात आहे.बजाज चौकातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम रेंगाळत सुरू आहे. पेट्रोल डिझेल,घरगुती वापराच्या गॅसच्या वाढलेल्या किंमतीबाबत भाजपच्या वतीने बोलले जात नाही. शेतमालाला भाव मिळत नाही.सोयाबीनचे भाव २०१४ मध्ये होते,तेच सध्याही आहे. खते, कीटकनाशकाचे भाव वाढले, शेतमालाचे भाव लोळले, शेतमालाला हमी भावाच्या कायद्याचा आधार देण्याविषयी सत्तेतली माणसे बोलत नाही, युवकांना बेरोजगारीने ग्रासले, यावर भाजपच्या वतीने मुखभंग होत नाही,याबाबत मतदारांत सुप्त संताप आहे. मतदारांतील संतापाचा सामना सत्तेतल्यांनाच होत आहे. त्याचवेळी विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवाराबाबत सहानुभुतीने बोलले जाते.त्यांची पाटी कोरी आहे, असे मतदार बोलतात. भाजपच्या उमेदवाराची यातून डोकेदुखी वाढत आहे. भाजपमध्ये अंतर्गत आलबेल नाही. काही शरिराने भाजपसोबत पण मनाने त्यांना यापूर्वी दिलेल्या राजकीय त्रासाने बाजूला, अशा सावध भूमिकेत आहे. त्यातच हिंगणघाटच्या सभेत माजी केंद्रीय मंत्री अशा बिरुदावलीसह वावरणार्या मोहितेंच्या जाहीर मुक्ताफळांनी भाजपचीच अडचण वाढविली आहे. त्यांना विविध पक्षांत वावरण्याचा अनुभव यामुळे चर्चेत आला पण त्याचा फटका सत्तारुढ नेत्यांना बसवून गेला. काहीही असले तरी या निवडणुकीच्या निकाल कौलाबाबत आश्वस्ततेने बोलणे सध्या तरी जोखमीचेच झाले आहे.मतदारांतील सुप्त संतापाची लाट शमताना सध्या तरी दिसत नाही. उलट तिचा भडका उडताना दिसत आहे.यात शेतकरी आहेत, युवक आहेत,सामान्य कष्टकरी आहेत.