रामदास तडस यांच्या उमेदवारीला गृहकलहाचे तडे; अमर काळे यांच्यासमोरील आव्हानही तगडेच!
वर्धा (प्रकाश कथले) – लोकसभा निवडणुकीत भाजपच्यावतीने पुन्हा उमेदवारी मिळविण्यात विद्यमान खासदास रामदास तडस यशस्वी झाले असले तरी मागील दोन निवडणुकांत त्यांना सामोरे न जावे लागणार्या समस्यांनी त्यांचा या निवडणुकीत पाठलाग करणे सुरू केले आहे. त्यांच्या उमेदवारीला गृहकलहाचे तडे बसताना दिसत आहे. यातील पहिला गृहकलहाचा तडा त्यांच्या कुटुंबातील आहे तर दुसरा तडा भाजपने कितीही नकार दिला तरी पक्षांतर्गतचा आहे. जोडीला जनमानसातील भाजपबाबतच्या नाराजीचा मुद्दा आहे. त्याचवेळी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अमर काळे यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीच्यावतीने कमालीचे तगडे आव्हान भाजपसमोर उभे केले आहे. पुढील दिवसांत राजकीय चुरस वाढत त्यातून कोणतीही नवी आव्हाने रामदास तडस यांच्या समोर उभी राहतील, याची खात्री देता येत नाही.
मतदारांच्या मनकौलाचा अंदाज घेणे कठीणच, पण तो सार्वजनिकस्थळी देहबोलीतून दिसतो. सेवावृत्तीच्या कर्तबगारीने तेजांकीत होत निवडणुकीला सामोरे जाण्याचे दिवस संपले असल्याचे मतदारांनीही मान्य केले. त्याचवेळी ते उमेदवारांनाही मान्य असतेच. राजकीय पक्षातली धूसफूस,ही पाचवीलाच पूजलेली असते. त्यामुळे या परिस्थितीचा सामना करावा लागणे, हे अपेक्षितच आहे. भाजप उमेदवार रामदास तडस यांच्या उमेदवारीला गृहकलहाचा पहिला तडा त्यांच्या स्नुषा पूजा पंकज तडस यांनी दिला. त्यांनी थेट रामदास तडस यांना निवडणूक मैदानात आव्हान देण्याचा अनपेक्षित पवित्रा घेतला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत त्यांनी तो मागे घेतला नव्हता. त्यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला जावा, या प्रयत्नांना अपयश आले. यातून रामदास तडस यांना राजकीय लढाईसोबत कौटुंबिक लढाईचे वळण मिळाले. भाजप हा कार्यकर्त्यांचा कुटुंब समूह आहे,असे मान्य केले तर भाजपतंर्गत धूसफूस आहेच. यातला पहिला कलहाचा तडा त्यांच्या देवळी तालुक्यातूनच आहे. या तड्यामागील एक कारण मागील विधानसभा निवडणुकीत माजी खासदार सुरेश वाघमारे यांचा झालेला निसटता पराभव एक कारण आहे.भाजपचे प्रदेश पदाधिकारी राजेश बकाणे यांच्यासोबत खासदार तडस यांचे राजकीय मतभेद झाकले तरी ते दिसतातच. ते नाकारले तरी कायमच राहणार,असे दिसते. तिसरी नाराजी थेट मतदारांत आहे.ती रामदास तडस यांच्या बाबत कमी पण केंद्र सरकारच्या धोरणातून शेतकरी तसेच नागरिकांना,बेरोजगार युवकांना बसलेल्या चटक्यातून व्यक्त होणारी आहे. घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची झालेली भाववाढ, पेट्रोल डिझेलची झालेली भाववाढ, खतांची झालेली भाववाढ, शेतमालाचे घसरलेले भाव, दुप्पट उत्पन्न करण्याच्या घोषणेला मिळालेली मूठमाती, जिल्ह्यात वाढलेली बेरोजगारी, याचा मोठा फटका सत्तारूढ भाजपच्या उमेदवाराला बसण्याची चिन्हे आहेत.जिल्ह्यात मागील १० वर्षांत एकही मोठा उद्योग आला नाही, याबाबत युवकांत नाराजी आहेच. जे उद्योग येथे आहेत, तेथे स्थानिकांना रोजगार किती, हेही युवकांतील नाराजीचे एक कारण आहे. या तड्यांना सांधणे फारसे सोपे सध्या तरी दिसत नाही. राजकीय ज्योतिषी यशापयशाचे कोणतेही गणित मांडत असले तरी वास्तव वेगळे दिसत आहे.
महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांना पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे.त्यांच्यावर कामे न केल्याचा आक्षेप लावायला संधीच नाही. वर्धा लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला गेला आहे. अमर काळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना थेट ज्येष्ठ नेते शरद पवार आले होते.ही घटना सहजतेची नाही. शरद पवार यांनी येथील निवडणूक फार मनावर घेत त्याबाबतचे सूक्ष्म राजकीय नियोजन केले असल्याचेच ते द्योतक आहे. शरद पवार हे उन्हाच्या कडाक्यात कार्यकर्त्यांच्या रॅलीतील खुल्या वाहनात आग्रहाने अमर काळे यांच्यासोबत बसून होते. ही बाब नागरिकांना साद देऊन गेली. अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी नागरिकांतील उत्स्फूर्तता लपून राहात नव्हती. रॅलीत युवकांसह शेतकर्यांची, महिलांची संख्या मोठी होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास जाताना चारुलता टोकस बाजूला राहून चालत होत्या. शरद पवार यांनी त्यांना माझ्यासोबत चला, असे म्हटले. याशिवाय उमेदवारी अर्ज सादर करताना महाविकास आघाडीतील प्रत्येक पक्षाच्या नेत्याला, पदाधिकार्याला बोलावून घेतले जात होते. यावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांची सूक्ष्म नजर होती. त्यामुळे महाविकास आघाडीच्याच नव्हे तर मतदारांतही काय संदेश जायचा तो गेला. त्यामुळे राजकीय चुरस पहिल्या दिवसांपासूनच वाढली. सध्या ही अमर काळे यांच्याकरीताची जमेची बाजू असली तरी हे वातावरण त्यांना टिकवून ठेवावे लागेल. मतदारांना गृहीत धरण्याचे दिवस संपलेत,हे या निवडणुकीतून स्पष्ट होईल. जिंदाबादचे नारे कितीही लागले तरी निवडणूक कालावधीत मतदारच जिंदाबाद असतो, त्याची उपेक्षा अंगलट येते, हेही दिसेल, असे सध्याचे वातावरण आहे.