गुढीपाडव्याचा शुभमुहूर्त; सिंदखेडराजा येथे मॉसाहेब जिजाऊंच्या दर्शनाने फुटणार रविकांत तुपकरांच्या प्रचाराचा नारळ!
– तुपकरांच्या कार्यालयातून एकच फोन, अन् हजारो समर्थक नियोजन बैठकीला हजर!
बुलढाणा (संजय निकाळजे) – निवडणूक म्हटली म्हणजे कार्यकर्त्यांची काही दिवस का होईना मजा असते. उमेदवारदेखील त्याचा कोणताही शब्द खाली पडू देत नाही. खाऊन पिऊन अशी गाडी तरी फिरायचं असलं तरी त्याला ती गाडी भेटते. मात्र क्वचितच असे काही उमेदवार असतात की कार्यकर्ते त्याच्यासाठी जीवाचं रान करतात. असंच एका शेतकर्याचे पोरगं शेतकर्यांसाठी बुलढाणा लोकसभेचे निवडणूक लढते त्यासाठी कार्यकर्तेसुद्धा झटून कामाला लागले आहेत. आपण आपल्या स्वखर्चाने फिरून, आपल्या घरची चटणी-भाकर खाऊन रविकांत तुपकरांचा प्रचार यावेळी करायचा आहे, असा निर्धार करत खाऊन घरची चटणी भाकर.. निवडून आणू रविकांत तुपकर, असा बुलंद नारा आज हजारो तुपकर समर्थकांनी दिला. तुपकरांच्या ऑफिसमधून एकच फोन गेला आणि हजारोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी नियोजन बैठकीला हजेरी लावली. याच बैठकीत रविकांत तुपकर म्हणजे तुम्ही स्वतः निवडणुकीत उभे आहात, असे समजून आजपासून कामाला लागा, असे आवाहन यावेळी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले. मंगळवारी, दि.९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करणार असल्याचेदेखील यावेळी त्यांनी जाहीर केले. ज्याप्रमाणे अर्ज भरण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित झालात त्याचप्रमाणे प्रचाराचा नारळ फोडण्यासाठीदेखील हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, असे आवाहनदेखील, रविकांत तुपकर यांनी केलेले आहे.
कोणतीही निवडणूक म्हटली म्हणजे मेजवानी, निवडणुकीच्या दिवसात काही दिवसापुरतं का होईना उमेदवार कार्यकर्त्यांना खाऊन पिऊन खुश ठेवतात. मात्र याची कशाची पर्वा न करता सर्व सामान्य जनतेचा उमेदवार म्हणून लोकसभेच्या रिंगणात उभे असलेले रविकांत तुपकर यांच्या प्रचाराची नियोजन तसेच निर्धार बैठक ७ एप्रिल रोजी गोलांडे लॉन्स येथे पार पडली. तुमच्या स्वतःच्या खर्चाने निवडणुकीच्या नियोजन बैठकीसाठी उपस्थित राहा, अशा साध्या एका फोनवर हजारो नागरिक व युवा कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित झालेले दिसून आले. यावेळी सुरुवातीला काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सूचना मांडल्या, प्रचाराच्या नियोजनाबाबतीत काही मुद्दे यावेळी चर्चिल्या गेले, तर काहींनी रविकांत तुपकरांच्या कामाचा उल्लेख या ठिकाणी केला. कोरोना काळात सिंगापूर येथे अडकून पडलेल्या एका इंजिनियर युवकाने सर्व लोकप्रतिनिधी, पुढारी पदाधिकार्यांना संपर्क करूनही मला मदत मिळाली नाही, परंतु तुपकरांनी दोन दिवसात मला सिंगापूरवरून बुलढाण्यात पोहोचवले, असे यावेळी आवर्जून सांगत अशा माणसाला संसदेत पाठवण्याचे आवाहन केले.
येणारा काळ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काळ आहे. या काळात संयम ठेवा, शांत रहा, आचारसंहितेचा भंग होईल असे कोणतेही कृत्य करू नका, कुणाच्याही भावना दुखतील असे बोलू नका, विरोधकांना उत्तर जरूर द्या पण चांगल्या भाषेत, अशा सूचनासुद्धा यावेळी रविकांत तुपकरांनी केल्या. ९ एप्रिल रोजी मंगळवारी सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊंच्या राजवाड्यात जिजाऊंचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडला जाईल आणि जिल्हाभर प्रचाराला सुरुवात होईल, असा निर्णय यावेळी घेण्यात आला. सिंदखेडराजा येथे माँ जिजाऊंचे दर्शन घेऊन विजयाचा निर्धार करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ते, नागरिक, तरुण महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनदेखील यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.
यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, जनशक्तीविरुद्ध धनशक्ती अशी ही लढाई आहे. गेल्या बावीस वर्षाच्या आपल्या संघर्षाच्या कामाची पावती आपल्या येणार्या वीस दिवसांच्या प्रयत्नातून आपल्याला मिळणार आहे, त्यामुळे रविकांत तुपकर नाही, आपण स्वतः निवडणुकीला उभे आहोत असे समजून आतापासून कामाला लागा. आपल्याकडे साधनसामुग्री कमी आहे, आपल्याकडे पैसा नाही, परंतु आपल्याकडे तुमच्यासारखी हक्काची लढणारी माणसं प्रचंड मोठ्या संख्येने आहे. हीच आपली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते आता खोटे- नाटे आरोप करत आहेत. विविध अफवा पसरवत आहेत परंतु त्यांच्या अफवांना आणि आरोपांना बळी पडू नका. विद्यमान खासदारामुळेच यावर्षीचे विम्याचे पैसे आपल्याला मिळू शकले नाही ही सत्यता आहे, माझ्या गाडीचा आणि नंबरचा गवगवा ते करतात, परंतु मला सर्वसामान्य जनतेने वर्गणी करून ही गाडी घेऊन दिलेली आहे. एवढेच नव्हे तर गाडीत फिरण्यासाठी डिझेलला म्हणून पाच लाखाचा निधीदेखील जमा करून दिला आहे. यांच्याकडे मात्र व्हीआयपी नंबरच्या आणि कोट्यवधी रुपयांच्या अनेक गाड्या आहेत, ह्या गाड्या कुठून आणल्या हे जनतेला माहिती आहे. त्यामुळे जनतेला फसविण्याचे काम करू नका. जनतेने आता ही निवडणूक गांभीर्याने डोक्यावर घेतली आहे. पक्ष -जात – धर्म बाजूला ठेवून सर्व सामान्य जनता आता एकत्र आली आहे. रविकांत तुपकर अमूक नेत्याचा माणूस आहे, प्रमुख नेत्याचा उमेदवार आहे असा आरोपही हे करत आहेत. परंतु मी कोणत्याच पक्षाचा नाही, कोणत्याच नेत्याचा नाही, मी कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा उमेदवार आहे आणि शेवटपर्यंत राहील, असेदेखील यावेळी रविकांत तुपकर यांनी ठासून सांगितले.
गोपाल शिप्पलकर ठरला हिरो!
मोताळा तालुक्यातील गोपाल शिप्पलकर या कार्यकर्त्याच्या पत्नीने मणीमंगळसूत्र मोडून रविकांत तुपकरांना निवडणुकीसाठी आर्थिक मदत दिली आहे. तुपकरांनी ही मदत नाकारली होती. परंतु या दांपत्याने शपथ दिल्यामुळे त्यांना ही रक्कम स्वीकारावी लागली. परंतु विरोधकांनी यातदेखील वेगळा डाव आखला होता. पाच लाख रुपये देतो फक्त तुपकरांनी माझ्याकडून बळजबरीने मंगळसूत्र विकूण मदत घेतली असे सांग, असे विरोधकांनी गोपाल शिप्पलकर यांना सांगितले. परंतु या स्वाभिमानी शिलेदाराने पाच लाख रुपये नाकारून मी गद्दार होणार नाही, असे ठामपणे सांगितले. हा किस्सा गोपाल शिप्पलकर यांनी माइकवर येऊन सांगितला तेव्हा सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट करून त्याला हिरो ठरवले.
————-