Breaking newsBULDHANAHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

विजयराज शिंदेंनी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने दबाव वाढविला!

– नागपुरातील बैठकीत शिंदेंना ‘युतीधर्मा’चे पालन करण्याचा सल्ला; अर्ज मागे घेण्याचे निर्देश
– विजयराज शिंदेंनी उद्या अर्ज मागे न घेतल्यास पक्षातून हकालपट्टी निश्चित!

बुलढाणा/नागपूर (विशेष प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांच्याशी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी सविस्तर चर्चा करून शिंदेंचे गार्‍हाणे ऐकून घेतले. तथापि, ‘युतीधर्मा’चे पालन करून उद्याच अर्ज मागे घ्या, असे निर्देश शिंदेंना दिले. कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतो, असे सांगून विजयराज शिंदेंनी बंडाचा झेंडा कायम ठेवण्याची देहबोली यावेळी दाखवली. शिंदेंचा ‘मूड’ पाहाता, बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून, त्यांचे आमदार व नेते बुलढाण्यात जे काही वक्तव्ये करत आहेत, त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘शिंदेंची औकात’ काढली गेल्याची नाराजीही त्यांनी बोलून दाखवली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी विजयराज शिंदेंशी फोनवरच चर्चा करून, ‘संबंधितांना योग्य ती समज देतो, पण तुम्ही बंडखोरी टाळा’, अशी विनंती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विजयराज शिंदे यांच्या फोनवरून चर्चा करत, ‘आपल्याला एक एक जागा महत्वाची असल्याने उद्या अर्ज मागे घ्या, महायुतीत आपला योग्य तो सन्मान राखला जाईल, असा शब्द दिला. त्यामुळे आता विजयराज शिंदे काय भूमिका घेतात? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, बुलढाणा व हिंगोली जिल्ह्यात निर्माण झालेला हा बंडखोरीचा पेच सोडविण्यासाठी संकटमोचक अशी ओळख निर्माण झालेले भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाजन यांनीदेखील विजयराज शिंदे यांच्याशी संपर्क साधून, समजूत काढली. आज ते बुलढाण्यात आले होते. परंतु, शिंदे हे नागपुरात होते. त्यामुळे महाजन हे उद्या (सोमवारी) पुन्हा येण्याची शक्यता आहे. कसेही करून बुलढाणा व हिंगोली जिल्ह्यातील बंड शमविण्याचे मोठे आव्हान गिरीश महाजन यांच्यासमोर उभे ठाकलेले आहे.

महायुतीच्या जागावाटपात बुलढाण्याची उमेदवारी जाहीर करताना आपल्याला विश्वासात घेतले गेले नाही. विद्यमान खासदाराबाबत जिल्ह्यात नाराजी असताना बुलढाण्याची जागा भाजपला घेणे गरजेचे होते. भाजपने गेली तीन वर्षे या मतदारसंघात लोकसभेची तयारी केली, आणि शेवटी ही जागा शिंदे गटाला सोडली गेली. तसेच, शिंदे गटाच्या नेत्यांकडून अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडाचा झेंडा रोवत लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिंदेंनी दोन नामंकनपत्र भरले होते. एका अर्जात पक्षाचा एबी फॉर्म जोडला न गेल्याने तो बाद झाला तर अपक्ष भरलेला अर्ज पात्र ठरलेला आहे. त्यामुळे विजयराज शिंदे यांनी आपला अर्ज मागे घ्यावा, यासाठी कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांनी विजयराज शिंदे यांच्या घरी जात त्यांची समजूत काढली. तेथे शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेली टीका जिव्हारी लागली असल्याने अर्ज मागे घेणार नाही, असे स्पष्ट केले. त्यामुळे आ. महाले यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी संपर्क साधून, त्यांना झालेली चर्चा कथन केली. त्यावर बावनकुळे यांनी विजयराज शिंदे यांना नागपुरात पाचारण केले. त्यानुसार, आज (दि.7) दुपारी विजयराज शिंदे, आ. श्वेताताई महाले पाटील, गणेश मांटे हे बावनकुळे यांच्या निवासस्थानी पोहोचले. या चर्चेत शिंदे यांनी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री व आमदार यांनी केलेली टीका व झालेला अपमान सविस्तरपणे विषद केला. अर्ज दाखल करण्याच्या दिवशी, २ तारखेला माध्यमांशी बोलताना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी, ‘शिंदेंची औकात काय’? असा सवाल केला होता. आमदार संजय गायकवाड यांनी, शिंदे यांनी निवडणूक लढवूनच दाखवावी, असे आव्हान दिले होते. त्यामुळे लढण्याचा निर्धार करून प्रचार सुरू केला, असे विजयराज शिंदेंनी वरिष्ठांना सांगितले. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असून, तीन आमदार आहेत. भाजपच्या पाठिंब्यावर मैत्रीपूर्ण लढतीची परवानगी द्यावी, अशी विनंतीदेखील शिंदेंनी बावनकुळे यांच्याकडे केली. मात्र, बावनकुळे यांनी ‘युतीधर्म’ महत्वाचा असून, ‘तुमच्या ज्यांच्याबद्दल तक्रारी आहेत त्यांना समज देऊ ‘असा शब्द दिला. आपण भरलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, युतीधर्माचे पालन करून महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार करावा, अशा सूचना बावनकुळे यांनी विजयराज शिंदेंना याप्रसंगी दिल्यात. त्यावर विजयराज शिंदेंनी अर्ज मागे घेण्याचा ठोस शब्द न देता, ‘कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेतो’, असे सांगितल्यानंतर चाणाक्ष बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून, सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. मुख्यमंत्री शिंदे यांनीही विजयराज शिंदे यांच्याशी चर्चा करताना, ‘संबंधित नेत्यांना योग्य ती समज देऊ, पण तुम्ही बंडखोरी करू नका’, अशी विनंती केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विजयराज शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा करताना, ‘आपल्याला एक एक जागा महत्वाची आहे. बंडाचे पाऊल उचलू नका. उद्या अर्ज मागे घेऊन युतीधर्माचे पालन करा, असा सल्ला दिला. काही तक्रारी असतील तर त्या आपल्या पातळीवर चर्चा करून दूर करता येतील’, असेही फडणवीस म्हणाले. त्यामुळे विजयराज शिंदे यांची आक्रमकता जवळपास कमी झाली असून, उद्या ते आपला अर्ज मागे घेतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
दरम्यान, बुलढाण्यातील विजयराज शिंदे व हिंगोलीतील श्याम भारती महाराज व इतरांनी केलेली बंडखोरी शमविण्याची जबाबदारी फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपावलेली आहे. त्यादृष्टीने हिंगोलीला जाण्यापूर्वी महाजन हे आज सकाळी बुलढाण्यात आले होते. परंतु, तोपर्यंत विजयराज शिंदे व श्वेताताई महाले, गणेश मांटे हे नागपूरकडे रवाना झालेले होते. त्यामुळे महाजन यांनीदेखील शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यांची समजूत काढली. महायुतीत तुमचा योग्य तो सन्मान राखला जाईल, असे महाजन यांनी शिंदेंना सांगितले. त्यानंतर महाजन हे हिंगोलीला रवाना झाले.


बुलढाणा मतदारसंघात शिंदे गटाचे मावळते खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळाली आहे. मात्र त्यांच्याविरोधात भाजपचे लोकसभा निवडणूक प्रमुख, माजी आमदार विजयराज शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवला आहे. छाननीमध्ये त्यांचा भाजपचा अर्ज बाद झाला, मात्र अपक्ष म्हणून भरलेला अर्ज कायम राहिला. स्थानिक पातळीवरील नेत्यानी केलेले मनधरणीचे प्रयत्न फोल ठरले. एवढेच नव्हे तर शेगाव येथील गजानन महाराजांचे दर्शन घेऊन शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला. एवढेच नव्हे तर खासदार जाधवांचे गृहक्षेत्र असलेल्या मेहकर तालुक्यातील बेलगाव येथून त्यांनी काल शनिवारपासून प्रचाराला दणक्यात सुरुवात केली. भाजपच्या नेत्यांनी केलेल्या मनधारणी व निर्माण केलेल्या दबावानंतर शिंदे काय निर्णय घेतात? याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून हे. या संदर्भात उद्या, सोमवारी बुलढाण्यात कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे विजयराज शिंदे यांनी सांगितले आहे. अर्ज मागे घेण्याची उद्या, ८ एप्रिल ही अंतिम मुदत आहे. उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत माघार घेता येणार आहे. यामुळे शिंदे माघार घेतात की बंडाचा झेंडा कायम ठेवतात? याकडे भाजपच्या नेत्यांच्या नजरा आहेत. शिंदे यांनी बंडखोरी कायम ठेवली तर मात्र त्यांची भाजपातून हकालपट्टी निश्चित मानली जात आहे.


बंडखोरांना ‘थंड’ करण्यासाठी भाजपने गिरीश महाजनांना लावले कामाला!

या लोकसभा निवडणुकीत अनेक ठिकाणी भाजपमध्ये बंडखोरी झाल्याचे पहायला मिळत आहे. या संदर्भात काल ‘वर्षा’ बंगल्यावर झालेल्या बैठकीत ‘युतीधर्म’ एकट्या आम्हीच पाळायचा का? अशी आक्रमक भूमिका घेत आता तडजोड करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना केले होते. शिवसेना-भाजपमधील हा वाढता तणाव कमी करण्यासाठी बुलढाणा व हिंगोली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या बंडोबांना थंड करण्याची महत्वपूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी गिरीश महाजन यांच्यावर सोपावली आहे. हिंगोलीत शिंदे गटाने भाजपच्या सूचनेवरून हेमंत पाटील यांची उमेदवारी बदलत, बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे. तरीदेखील भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा महंत योगी श्याम भारती महाराज, अ‍ॅड. शिवाजी जाधव आणि रामदास पाटील सुमठाणकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल करत, शिंदे गटाचे टेन्शन वाढवलेले आहे. हिंगोलीत महंत श्याम भारती महाराज यांचे मोठे प्रस्थ असून, त्यांची बंडखोरी शिंदे गटाला जिव्हारी लागलेली आहे. त्यामुळे हिंगोलीतील बंडोबांना थंडोबा करण्याची जबाबदारी भाजपने संकटमोचक, अशी ओळख असलेले मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सोपवली आहे. आज रविवारी (७ एप्रिल) महाजन हे सुरूवातीला विजयराज शिंदेंच्या मनधरणीसाठी बुलढाण्यात आले होते. परंतु, शिंदे हे नागपुरात असल्याने ते तसेच हिंगोलीत गेले. भाजप बंडखोरांशी चर्चा करून त्यांना माघार घ्यायला लावण्यासाठी महाजन यांनी बंडखोरांवर चांगलाच दबाव निर्माण केलेला आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!