BuldanaBULDHANAHead linesMEHAKARPolitical NewsPoliticsVidharbha

सगळ्याच नेत्यांच्या रॅलीला तुंबळ गर्दी; एवढी माणसे आली कुठून?

– शेतकरी नेते रविकांत तुपकर व प्रा. नरेंद्र खेडेकर यांची प्रचारात आघाडी!
– विजयराज शिंदेंचा मेहकरातून प्रचाराचा श्रीगणेशा; म्हणाले, प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याची ही सुरुवात!
– जिल्ह्यात एकच खमंग चर्चा : काहींनी प्रतापरावांची फूड पाकिटे, पाण्याच्या बाटल्या घेतल्या, अन तुपकरांच्या रॅलीला गाठले!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाणा मतदारसंघातून २५उमेदवारांचे नामांकनपत्र वैध ठरले आहेत. हे अर्ज भरण्यासाठी प्रमुख उमेदवारांनी काढलेल्या रॅलीत मात्र तोबा गर्दी दिसून आली. त्यामुळे उमेदवारांना हायसे वाटले असले तरी, तेही काहीकाळ बुचकळ्यात पडले असतील. कारण, सर्वच उमेदवारांनी जोरदार गर्दी जमवून शक्तिप्रदर्शन केले आहे. त्यामुळे ही गर्दी जमली की जमवली, याचीही चर्चा आता होऊ लागली आहे. दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी सध्यातरी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. भाजपचे लोकसभा प्रभारी विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली असून, प्रचाराचा धडाकेबाज शुभारंभ मेहकर तालुक्यातील बेलगाव येथून ५ एप्रिलरोजी केला. प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध ही लढाईची सुरुवात असून, याला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले. वंचित आघाडीचे वसंतरावमामा मगर यांनी मोजक्याच पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत आपला नामांकनअर्ज दाखल केला व शक्तिप्रदर्शन वैगरे टाळले. ते खरेच अर्ज भरतात की नाही, याबाबतच शंकाकुशंका निर्माण केल्या जात होत्या. मध्यंतरी त्यांचा फोनही लागत नसल्याने ते फोन स्वीचऑफ करून का बसलेत? याबाबतही सोशल मीडियांवर शंकांचा पूर आल्याचे दिसून आले होते. परंतु, अर्ज दाखल करून त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

बुलढाणा लोकसभेसाठी नामंकन पत्र भरण्याची प्रक्रिया आता संपली असून, छाननीअंती २५ जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. अर्ज भरण्यापूर्वी प्रमुख उमेदवारांकडून शक्तिप्रदर्शन करण्यात आले. विशेषतः शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे शक्तिप्रदर्शन जोरदार ठरले. त्यानंतर शिंदे गटाचे खा. प्रतापराव जाधव, वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके व शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महायुतीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. विशेष म्हणजे, या सर्व शक्ती प्रदर्शनात तोबा गर्दीही उसळली होती. त्यामुळे सर्वांनाच हायसे वाटले तरी काहीकाळ उमेदवार बुचकळ्यातदेखील पडले. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी २ एप्रिलरोजी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. ‘स्वतःची खाऊ चटणी भाकर, निवडून आणू रविकांत तुपकर’ अशा घोषणा देत लोक पदरमोड करून बुलढाण्यात मोठ्या संख्येने दाखल झाल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, खा. प्रतापराव जाधव यांनीही याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शिंदे गटाचे नेते मंत्री गुलाबराव पाटील, शिंदे गट व भाजपचे आमदार व नेते प्रामुख्याने उपस्थित होते. विशेष म्हणजे, गर्दी जमवण्यासाठी त्यांनी गाड्या, जेवणाचे पाकीट व बिसलरी पाण्याची चोख व्यवस्था केली होती, असे कार्यकर्ते खासगीत बोलताना सांगत आहेत. वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके यांच्याकडेही गर्दी दिसली. ४ एप्रिलरोजी महाआघाडीचे शिवसेना (ठाकरे) उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांचाही अर्ज दाखल करतेवेळी चांगलीच गर्दी झाल्याचे दिसले. यावेळी प्रामुख्याने शिवसेना युवानेते आ. आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आ.रोहित पवार, शिवसेना (ठाकरे) नेत्या सुषमा अंधारे यांनी सभा चांगलीच गाजवली. सर्वच प्रमुख उमेदवारांच्या शक्ती प्रदर्शनाला चांगली गर्दी दिसून आल्याने हायसे वाटले तरी उमेदवार काहीकाळ बुचकळ्यात पडल्याचे दिसून आले. गर्दी जमली की जमवली यावरही बरीच चर्चा होताना दिसून येत आहे. खा. प्रतापराव जाधव यांच्या रॅलीतील लोक जेवणाची पाकिटे घेऊन रविकांत तुपकर यांच्या रॅलीत सामील झाल्याचे किस्सेही चवीने चघळले जात आहेत. तुपकर यांनी शेतकर्‍यांच्या भरवशावर निवडणूक लढविण्याचे ठरवल्याने गेल्या सहा महिन्यापासून त्यांनी जय्यत तयारी सुरू केली. जवळपास जिल्ह्यातील बरेच गावात त्यांची पहिली फेरीही झालेली आहे. दुसरीकडे, शिवसेना (ठाकरे) उमेदवार प्रा.नरेंद्र खेडेकर यांनीही सध्या प्रचारात आघाडी घेतल्याचे सांगितले जाते. निवडणूक लागण्यापूर्वीच शिवसेना (ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे व नेते खा. संजय राऊत यांच्या जिल्ह्यात पाच सभा झाल्या. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनीही यात्रा काढली होती. तर खा. जाधवांनीही महायुतीचे मेळावे व भेटीगाठी सुरू केल्या असल्या तरी मोठ्या नेत्यांच्या सभा अद्याप झाल्या नाहीत. त्या नियोजीत असल्याचे सांगितले जात आहे.


दरम्यान, भाजपचे बुलढाणा लोकसभा प्रभारी तथा बुलढाणा विधानसभेचे तीनदा आमदार राहिलेले विजयराज शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, मेहकर तालुक्यातील बेलगावातून ५ एप्रिलरोजी त्यांनी प्रचाराचा श्रीगणेशा केला. प्रस्थापितांच्या होणार्‍या अन्यायाविरुद्ध लढण्याची सुरुवात येथून करत असून, आता थांबायचे नाही असा निर्धार व्यक्त करत आपण साथ द्या, असे भाविनक आवाहनदेखील यावेळी त्यांनी केले. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा बेलगावचे सरपंच अर्जुनराव वानखेडे यांनी यावेळी खा. प्रतापराव जाधव हे मेहकर-लोणार तालुक्यातील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यावर कसा अन्याय करतात, याची जंत्रीच यावेळी वाचून दाखवली. दरम्यान, शिंदे यांना अर्ज माघारी घ्यायला लावण्यासाठी भाजपने पुढाकार घेतला असून, चिखलीच्या आमदार श्वेता महाले व भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी सोपावली आहे. त्यामुळे ८ तारखेपर्यंत शिंदे हे अर्ज मागे घेतील, असे सांगितले जात आहे.
————

सगळ्याच नेत्यांच्या रॅलीला तुंबळ गर्दी; एवढी माणसे आली कुठून?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!