भाजपचे ‘हिंदूकार्ड’विरुद्ध ‘जिल्ह्याचा विकास’ या मुद्द्यांवर रंगणार लढती!
– योगी आदित्यनाथ यांच्या सभेने महायुतीचा प्रचार नारळ फुटणार; मोदी, गडकरींच्याही सभेचे नियोजन सुरू – सूत्र
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – एकीकडे शेती, पाणी, नोकर्या आणि जिल्ह्याचा विकास हे मुद्दे पेटले असताना, या लोकसभा निवडणुकीत भाजप व त्यांचे सहयोगी पक्ष ‘हिंदूकार्ड’ चालवणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे बुलढाण्यातील महायुतीच्या प्रचारसभांचा नारळ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीरसभेने फुटणार असल्याची माहिती भाजपच्या सूत्राने दिली आहे. शिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विदर्भाचे विकासपुरूष नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस यांच्याही सभांचे नियोजन केले जात आहे. योगी आदित्यनाथ एप्रिलच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात सभा घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपचे बुलढाणा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांची समजूत काढण्यासाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनी शिंदे यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष मांटेदेखील हजर होते. शिंदे यांना घेऊन श्वेताताई या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे उद्या नागपूरला जाणार आहेत. त्यामुळे शिंदे यांचे बंड थंड होण्याची दाट शक्यता आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यात मतदान होणार आहे. महायुतीच्यावतीने मावळते खासदार प्रतापराव जाधव यांना उमेदवारी मिळालेली आहे. जनमत त्यांना अनुकूल नसल्याचे दिसत असले तरी, नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ, नितीन गडकरी यांच्या सभानंतर वातावरण बदलू शकते, असा एक राजकीय अंदाज आहे. त्यामुळे भाजप व महायुतीचा महोल बनविण्यासाठी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जाहीरसभेने महायुतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार असल्याचे भाजपच्या नेत्यांकडून सांगण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ हे एप्रिलच्या दुसर्या किंवा तिसर्या आठवड्यात बुलढाण्यात सभा घेतील. या निमित्ताने त्यांचा विदर्भातील पहिलाच दौरा राहणार आहे.
प्रतापराव जाधव यांची लढत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्याशी असल्याचे दिसत असले तरी, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे महाआघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांना कट्टर शिवसैनिकांची असलेली सहानुभूति पाहाता, महायुतीचे नेते प्रचार मोहीम राबविताना विशेष काळजी घेत असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहाता, बुलढाण्यातील चौरंगी-पंचरंगी लढतीत प्रतापराव जाधवविरुद्ध इतर सर्व असा सामना होणार आहे. भाजपचे निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे हे आपला अर्ज मागे घेतात, की मैदानात कायम राहतात, हे ८ तारखेपर्यंत कळणार आहे. शिंदे हे जर मैदानात राहिले तर मात्र जिल्ह्यात पंचरंगी लढत अटळ आहे. त्यांनी आपला अर्ज मागे घ्यावा, यासाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील या जोरदार प्रयत्न करत असून, आज त्यांच्या शिंदेंच्या घरी जात त्यांची समजूत काढली. तसेच, त्या उद्या (रविवारी) शिंदेंना घेऊन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वसंतमामा मगर यांना वंचित बहुजन आघाडीने मैदानात उतरविल्याने माळी व प्रकाश आंबेडकरांना मानणार्या बहुजन समाजाची मते त्यांच्याकडे जाणे क्रमप्राप्त आहे. ही बहुतांश मते प्रतापराव जाधव यांची हक्काची मते होती. त्यातच विजयराज शिंदे हे मैदानात राहिले तर भाजप व हिंदुत्ववादी मतेही शिंदे खेचू शकतात. त्याचाही फटका जाधवांनाच बसणार आहे. त्यामुळे प्रतापराव जाधव यांची सर्व भीस्त ही आता भाजपच्या स्टार प्रचारकांच्या सभांवर राहणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ हे जिल्ह्यातील हवा फिरवू शकतात, असा राजकीय धुरिणांना विश्वास आहे. २६ एप्रिलला मतदान होणार असल्याने सर्व उमेदवारांकडे प्रचारासाठी तसा दोन ते तीन आठवड्यांचा वेळ उरला आहे. ८ तारखेनंतर मैदानात किती जण उरतात, यावर बुलढाण्यातील लढतीचे चित्र अवलंबून असणार आहे.
———-
सगळ्याच नेत्यांच्या रॅलीला तुंबळ गर्दी; एवढी माणसे आली कुठून?