– काल थाटात उद्घाटन; पहिला दिवस ‘सिद्धार्थ-११’ संघाने गाजविला!
चिखली (महेंद्र हिवाळे) – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त चिखली शहरात भव्य टेनिस बॉल क्रिकेटचा थरार रंगत आहे. काल (दि.५) नागसेन प्रीमिअर लीग-२०२४ चे मान्यवरांच्याहस्ते थाटात उद््घाटन झाले. पहिल्याच दिवशी सिद्धार्थ-११ या संघाने जोरदार फटकेबाजी करत दोन सामने खिशात घातले, व दिवस गाजविला. शहरातील नानाशेठ बोंद्रे स्टेडियमवर हा थरार दिवसेंदिवस रंगत असून, युवावर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. ‘ब्रेकिंग महाराष्ट्र मीडिया’ ग्रूप या सामन्यांचा मीडिया पार्टनर आहे.
५ ते १४ एप्रिल २०२४दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवानिमित्त नागसेन क्रिकेट प्रीमियर लीग आयोजित करण्यात आली आहे. या एनपीएल-२०२४ चे थाटामाटात उद्घाटन पार पडले. याप्रसंगी रामदासभाऊ देव्हडे, अॅड. विजयकुमार कस्तुरे, प्राध्यापक राजू गवई, विनयदादा कासारे, अॅड.सतीश गवई, दिगंबर पवार, मिलिंद भंडारे सर, नीलेशदादा जाधव, लेफ्टनंट सिद्धार्थ पैठणे, नागसेन बुद्धविहाराचे सचिव डॉक्टर डी. व्ही.खरात सर, नागसेन बुद्धविहार संचालक पी. के. साळवे सर, नागसेन संवर्धन समितीचे सुमेध जाधव, सचिन साळवे, अरुण भिसे, रामदास जाधव, राजेश बोर्डे, धनंजय साळवे, अभिजय साळवे, स्वप्निल साळवे, विकास चव्हाण, सुजित जाधव व प्रसिद्ध शिक्षक राहुल पवार सर हे उपस्थित होते.
अगदी थाटात उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर, लगेच सकाळच्या सत्रामध्ये स्वातंत्र्य-११ व सिद्धार्थ-११ या दोन संघामध्ये सामना रंगला. यामध्ये स्वातंत्र्य संघाने प्रथम फलंदाजी करत १०७ धावसंख्या काढून धावांचा डोंगर स्वातंत्र्य-११ यांच्यासमोर रचला. परंतु स्वातंत्र्य-११ संघाला फक्त ७६ धावांची मजल गाठता आली. त्यामुळे सिद्धार्थ-११ या संघाने मोठ्या धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. दुसरा सामना स्वातंत्र्य-११ व न्याय-११ यांच्यामध्ये रंगला. त्यामध्ये न्याय संघाने ६४ धावांचे लक्ष स्वातंत्र्य संघास दिले. परंतु यावेळी स्वातंत्र-११ न्याय संघाने पटापट खेळाडू गारद करत, ११ धावांनी विजय खेचून आणला. सायंकाळच्या सत्रामध्ये मध्ये न्याय-११ व सिद्धार्थ-११ या संघांमध्ये चुरशीचा सामना झाला. न्याय संघाने प्रथम फलंदाजी करत सिद्धार्थ-११ संघासमोर ९७ धावांचे लक्ष्य उभे केले. सिद्धार्थ संघाने हे लक्ष ९.१ एवढा षटकातच सात गडी राखून साध्य केले व हा सामना आपल्या खिशात घातला.
एनपीएलच्या या सामन्यांमध्ये, पहिल्या सामन्यात कान्हा खंडागळे हा सामनावीर ठरला, दुसर्या सामन्यामध्ये शेख अफजन, तिसर्या सामन्यांमध्ये अॅडव्होकेट जावेद चौधरी हा सामना वीर ठरला. सदरचे सामने नानाशेठ बोंद्रे स्टेडियमवर सुरू असून, या सामन्यांची संपूर्ण चिखली तालुक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. उद्या सकाळी आठ वाजता बंधुता-११ विरुद्ध समता-११ या दोन संघांचा सामना रंगणार आहे, हे सामने बघण्यासाठी संपूर्ण चिखली तालुक्यातील प्रेक्षकांमध्ये खूप आतुरता लागलेली आहे.