बिबी (ऋषी दंदाले) – शेतकरी नेते तथा लोकसभा निवडणुकीतील शेतकरी-कष्टकरी, युवकांचे उमेदवार रविकांत तुपकर यांची उद्या (दि.९) संध्याकाळी सहा वाजता किनगावजट्टू येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. या सभेला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केलेले आहे. या सभेतून शेतकर्यांची मुलुखमैदानी तोफ असलेले रविकांत तुपकर हे कुणावर आपली तोफ डागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. सद्या लोणार तालुक्यात तुपकरांची जोरदार लाट असून, किनगावजट्टूतील ही सभा विराट ठरेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची उद्या (दि.९) किनगावजट्टू येथील श्रीराम मंदिरासमोर संध्याकाळी सहा वाजता जाहीर प्रचार सभा होणार आहे. या सभेला परिसरातील शेतकर्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष सहदेव लाड यांनी केले आहे. २०२४ च्या लोकसभेचा बिगुल वाजला असून, बुलढाणा जिल्ह्यातील लोकसभेची निवडणूक ही फार रंगत होणार आहे, कारण सलग पंधरा वर्षे खासदार असलेले प्रतापराव जाधव यांच्याविरोधात शेतकरी नेते व गोरगरिबांचा, शेतकर्यांचा आवाज ठरलेले रविकांत तुपकर हे मैदानात उतरले आहेत. रविकांत तुपकर यांनी दोन एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करते वेळेस जिल्हाभरातूनच नव्हे तर महाराष्ट्रातून शेतकर्यांची फौज बुलढाण्यात धडकली होती. यावेळी कोणत्याही परिस्थितीत रविकांत तुपकरांना खासदार करून दिल्लीत पाठवण्याचा निश्चय शेतकर्यांनी केलेला आहे. तर लोणार व मेहकर तालुक्यांत तुपकरांची जोरदार लाट निर्माण झालेली आहे. आता उद्या, ९ एप्रिलपासून सिंदखेडराजा येथील मॉसाहेब जिजाऊ यांना अभिवादन करून सकाळी दहा वाजता रविकांत तुपकर हे आपल्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत व संध्याकाळी सहा वाजता तुपकर यांची लोणार तालुक्यातील किनगावजट्टू येथे भव्य प्रचार सभा होणार आहे, तरी या सभेला परिसरातील शेतकर्यांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सहदेव लाड यांनी केले आहे.