Head linesNAGARPachhim Maharashtra

घोगस पारगांवमध्ये होणार श्रीक्षेत्र भगवानगडाचा 90 वा नारळी सप्ताह

नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – श्री संत भगवानबाबांनी प्रारंभ केलेल्या नारळी सप्ताहाच्या ९० व्या वर्षीचे यजमानपदाचे शिवधनुष्य हे भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या घोगस पारगांव ग्रामस्थांनी उचलले आहे. श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधीपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराजशास्त्री बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली सप्ताहाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, मंडप उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. श्री संत भगवानबाबांनी फिरता नारळी सप्ताहाचा नावीन्यपूर्ण उपक्रम ९० वर्षांपूर्वी श्री क्षेत्र नारायणगडाच्या पायथ्याशी असलेल्या पखालडोह या ठिकाणी सुरू केला. त्यांचे पश्चात तीच सप्ताहाची परंपरा श्री क्षेत्र भगवानगडाचे द्वितीय उत्तराधिकारी वै.ह.भ.प.गुरुवर्य श्री संत भीमसिह महाराज यांनी सुरू ठेऊन बाबांचे कार्य सुरू ठेवले होते. वै.गुरुवर्य भीमसिंह महाराजांच्या वैकुंठगमनानंतर श्री क्षेत्र भगवानगडाचे तृतीय मठाधीपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ. नामदेव महाराजशास्त्री बाबा यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या सप्ताहाची एक वेगळा ओळख निर्माण झाली आहे. हा नारळी सप्ताह वैभवशाली असल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक सप्ताहामध्ये आठवडाभर उपस्थित असतात. नारळाचे यजमानपद स्विकारलेले ग्रामस्थ आठवडाभर तन, मन आणि धन खर्ची घालत श्रीगुरूंची सेवा करत असतात.

२१ एप्रील रोजी हा महोत्सव प्रारंभ होत असून, सप्ताहामध्ये ह.भ.प. महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ..नामदेव महाराज शास्त्री बाबा यांच्या अमृततुल्य रसाळवाणीतून ७ दिवस भव्य ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण सोहळ्याचा उपस्थित लाखो भाविकांना लाभ होणार आहे. सप्ताहामध्ये अनुक्रमे ह.भ.प.महंत कृष्णा महाराज शास्त्री, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकीकर, ह.भ.प.केशव महाराज ऊखळीकर, ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ,ह.भ.प.रामराव महाराज ढोक, ह.भ.प.पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तन सेवा होणार असून, सप्ताहाच्या सातव्या दिवशी रात्री ठीक ८:३० ते ११ या वेळेत श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ..नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे जागराचे जाहीर हरीकीर्तन होणार आहे. त्यानंतर काल्याच्या दिवशी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ..नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचे अमृततुल्य काल्याचे कीर्तन होईल. त्यानंतर जय भगवान ग्रुप, घोगस पारगांव यांच्या महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होईल. सप्ताहामध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ इ. धार्मिक कार्यक्रमही होतील.


विशेष आकर्षण : शास्त्री बाबांचे ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण

सप्ताहातील सर्वांत मुख्य आकर्षण म्हणजे ज्ञानेश्वरी भावकथेच्या रूपाने ज्यांनी देशभरातील भाविकांना ज्ञानेश्वरीतील ज्ञान सांगून वारकरी संप्रदायाकडे आकर्षित केले आहे असे श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.महंत श्रीगुरु न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्री बाबा यांचा सप्ताहामध्ये दररोज ठीक ३ ते ५ या वेळेमध्ये ज्ञानेश्वरी भावकथा निरूपण सोहळा संपन्न होणार आहे.


‘जय भगवान ग्रुप’ची महापंगत

आतापर्यंतच्या सर्व नारळी सप्ताहांमध्ये काल्याच्या पंक्तीचा महाप्रसाद हा संबंधित ग्रामस्थांनी तयार केला होता. परंतु यावर्षी मात्र घोगस पारगांवमधील ३८ तरुणांनी जय भगवान ग्रुपच्या माध्यमातून विशेष पुढाकार घेत नारळी सप्ताहाची काल्याची महापंगत देण्याचा निर्णय घेत एक आदर्श निर्माण केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!