Breaking newsBuldanaHead linesPolitical NewsPoliticsVidharbha

विजयराज शिंदेंचे बंड ‘थंड’; लोकसभा निवडणुकीतून माघार!

शिदेंच्या घरी जात प्रतापराव जाधवांनीही काढली समजूत!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे लोकसभा संपर्कप्रमुख तथा माजी आमदार विजयराज शिंदे यांचे बंड अखेर थंड झाले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील व भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश मांटे यांनी केलेली शिष्टाई यशस्वी ठरली असून, शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. विजयराज शिंदे यांनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी शिंदे गटाने भाजपवर जोरदार दबाव निर्माण केला होता. तसेच, शिंदे यांच्या पाठीमागे विरोधकांची फूस असल्याची राजकीय चर्चादेखील होत होती. त्यामुळे भाजपनेदेखील हे बंड गांभीर्याने घेत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यामार्फत शिंदेंची समजूत काढली, युतीधर्म पाळण्याचा सल्लाही दिला होता. अखेर भाजपच्या दबावामुळे विजयराज शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. तसेच, महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारात उतरण्याचे निश्चित केले आहे. त्यानंतर, शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्जही मागे घेतला. या घडामोडीनंतर महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव हे स्वतः शिंदे यांच्या बुलढाण्यातील रामनगर येथील निवासस्थानी दाखल झाले, व शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.

विजयराज शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करून खळबळ उडवून दिली होती. शिंदे गटाच्या स्थानिक नेत्यांवर संताप व्यक्त करत, त्यांनी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचेही जाहीर केले होते. परंतु, दोनच दिवसांत भाजपच्या वरच्या पातळीवरून सूत्रे हलली व शिंदे यांचे बंड थंड झाले. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून आ. श्वेताताई महाले पाटील यांनी याप्रकरणात यशस्वी मध्यस्थी केली. त्यानुसार, आज शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी घेतलेल्या छोटेखानी पत्रकार परिषदेत, निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. पक्षहित आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी अर्ज मागे घेत असल्याचे त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी आ. महाले, गणेश मांटे यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.


एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, की विजयराज शिंदे यांना लोकसभेच्या मैदानात उतरविण्यासाठी शिवसेना (ठाकरे) गटाची फूस आहे, अशी राजकीय चर्चा बुलढाण्याच्या राजकारणात चालू झाली होती. ही चर्चा भाजपच्या वरिष्ठांच्याही कानावर गेली होती. त्यामुळे भाजपने शिंदे यांची बंडखोरी गांभीर्याने घेतली. शिंदेंनी अर्ज मागे घ्यावा, यासाठी चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांना मध्यस्थी करण्यास पाठवून, चर्चा घडवून आणण्यात आली. या सर्व घडामोडींवर देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन व चंद्रशेखर बावनकुळे हे नेते लक्ष ठेवून होते. श्वेताताईंचे थेट रिपोर्टिंग फडणवीस यांना जात होते. त्यामुळे भाजपने पक्षहित व युतीधर्म या मुद्द्यांवर जोर दिल्याने, व ऐवढे करूनही विजयराज शिंदे यांनी ऐकलेच नाही तर मग वेळप्रसंगी त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचेही धोरण निश्चित केल्याने, अखेर पक्षाच्या दबावापुढे शिंदे यांना झुकावे लागले. शिंदे यांचा महायुतीत योग्य तो मान राखला जाईल, असा शब्द भाजपच्या नेत्यांनी त्यांना दिलेला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या स्थानिक नेत्यांना तोंडाला आवर घालण्याची सूचना केली आहे. त्यामुळे महायुतीतील हे बंड अखेर थंड झाले असल्याचे एका वरिष्ठ राजकीय नेत्याने स्पष्ट केलेले आहे. गिरीश महाजन यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्यामुळे बुलढाणा व हिंगोली जिल्ह्यातील भाजपअंतर्गतची बंडखोरी अखेर शमली आहे. विजयराज शिंदे यांच्याप्रमाणेच हिंगोलीतील भाजपच्या बंडखोरांनीही निवडणुकीतून माघार घेतली आहे.
———–

विजयराज शिंदेंनी अर्ज मागे घेण्यासाठी भाजपने दबाव वाढविला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!