– तरुणाईच जिल्ह्यात परिवर्तनाची क्रांती घडविणार : रविकांत तुपकर
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकरी व सर्वसामान्य जनतेचे उमेदवार रविकांत तुपकर यांना निशाणी म्हणून पाना हे चिन्ह मिळाले आहे. तुपकरांच्या हाती आता पाना आला आहे, त्यामुळे आता ते सगळ्यांचे नट-बोल्ट टाईट करणार, अशी आपसूक प्रतिक्रिया जनसामान्यांमधून उठत आहेत. उद्या, ०९ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे राष्ट्रमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. यावेळी सर्वसामान्य जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले आहे.
जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यावतीने आज ०८ एप्रिल रोजी अपक्ष उमेदवारांना चिन्ह वाटप करण्यात आले. चिन्ह वाटप करतांना अधिकृत पक्षांना प्राधान्य दिले जाते व त्यानंतर अपक्ष उमेदवारांना चिन्हवाटप केले जाते. रविकांत तुपकर हे अपक्ष उमेदवार असून त्यांना पाना हे चिन्ह देण्यात आले आहे. आता जिल्हाभर हा पाना फिरणार आहे. जिल्ह्यातील खीळखिळा झालेल्या विकास रथाच्या चाकाचे नट आता रविकांत तुपकर पाना फिरवून फिट करणार आहेत. रविकांत तुपकर उद्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राजमाता, राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन हजारो समर्थकांच्या उपस्थितीत प्रचाराचा नारळ फोडणार आहे. निर्धार परिवर्तन रथयात्रेच्या माध्यमातून रविकांत तुपकरांनी यापूर्वीच संपूर्ण जिल्हा पिंजून काढलेला आहे. या निर्धार परिवर्तन रथयात्रेला प्रत्येक गाव, वाडी, वस्तीमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. तर शहरांमध्येदेखील तुपकरांनी बैठका घेतलेल्या आहेत. आता पुन्हा एकदा धूमधडाक्यात प्रचाराला सुरुवात करत आहेत. सर्वांनाच चिन्ह मिळण्याची प्रतीक्षा होती. आता पाना हे चिन्ह जाहीर झाल्याने सर्व कार्यकर्ते एकजुटीने कामाला लागले आहेत.
‘खाऊन घरची चटणी भाकर…निवडून आणू रविकांत तुपकर’ असा नारा देत जिल्हाभरातील कार्यकर्ते व सर्वसामान्य नागरिक आणि तरुण आता जोमाने प्रचाराच्या कामाला लागले आहेत. उद्या सिंदखेडराजात हजारोंच्या संख्येने रविकांत तुपकर समर्थक प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी दाखल होणार आहेत. गुढीपाडव्यापासून प्रचार यात्रेला सुरुवात होणार असून जिल्हाभर आता जनतेचा बाणा निवडून आणू पाना, पाना…पाना… पाना… रविकांत तुपकर निवडून आणा असे नारे ऐकावयास मिळणार आहेत.
बेरोजगारीने त्रस्त तरुणाईच्या मेळाव्यात साधला थेट संवाद
सळसळत्या रक्ताच्या तरुणांमध्ये कोणतीही क्रांती घडवण्याची ताकद असते. हीच तरुणाई आता बुलढाणा जिल्ह्यात सर्वसामान्य जनतेचा अपक्ष उमेदवार निवडून आणत परिवर्तनाची नवी क्रांती घडवून आणणार आहे, असे प्रतिपादन रविकांत तुपकर यांनी केले. आज, ८ एप्रिल रोजी गर्दे वाचनालयाच्या सभागृहात आयोजित युवकांच्या थेट संवाद मेळाव्यात ते बोलत होते. बेरोजगार व स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे युवक या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांनी यापूर्वीच रविकांत तुपकर यांना अधिकृत पाठिंबा जाहीर केलेला आहे. दरम्यान, बेरोजगार व स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या युवक आणि युवतींनी स्वतः पुढाकार घेऊन ०८ एप्रिल रोजी स्थानिक गर्दे वाचनालयाच्या सभागृहात ‘बेरोजगारीने अस्वस्थ तरुणाईचा रविकांत तुपकरांशी थेट संवाद’ असा मेळावा आयोजित केला होता. बेरोजगार, स्पर्धा परीक्षेची तसेच पोलीस व रेल्वे भरतीची तयारी करणारे हजारो युवक-युवती या मेळाव्याला आवर्जून उपस्थित होते. तरुणाईची ही शक्ती एकजूटपणे रविकांत तुपकर यांच्या पाठीशी उभी राहून जिल्ह्यात नवी क्रांती घडवण्याचे संकेत देत होती. यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, राजकारण वाईट नाही परंतु राजकारणातील गंदगी संपवण्यासाठी तरुणांना पुढाकार घ्यावा लागणार आहे. चांगले व्हिजन असणारे, प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमेचे लोक राजकारणात आले तर राजकारणाची दिशा आणि दशा बदलायला वेळ लागणार नाही, आणि ही शक्ती केवळ तरुणाईच्या मनगटात आहे. गेल्या २२ वर्षांपासून तरुणांच्या सहकार्याने मी सर्वसामान्यांसाठी लढा देत आलो आहे. २२ वर्षात केलेला संघर्ष, हजारो पोलीस केसेस, तडीपारी, तुरुंगवास, पोलिसांच्या लाठीमाराचे वळ हे सर्व जनतेला माहिती आहे. २२ वर्षात केलेल्या कामाची मजुरी म्हणून एक मत मी मागत आहे. कष्टकरी, शेतकरी, सर्वसामान्य जनतेचा, तरुणांचा आवाज संसदेमध्ये पोहोचविण्यासाठी तरुणाईने दिलेले समर्थन लाख मोलाचे ठरणार आहे, असेही यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. एमपीएससी, यूपीएससी या परीक्षांची तयारी करण्यासाठी मुंबई, पुणे, दिल्ली या ठिकाणी जशा अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब आहेत, तसेच बुलढाणा जिल्ह्यात निर्माण झाल्या पाहिजे यासाठी मी प्रयत्न करणार आहे, गाव खेड्यांमध्ये सुसज्य ग्रंथालय आणि कॉम्प्युटर लॅब झाली पाहिजे, एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षा ऑफलाईन झाल्या पाहिजे, कोणत्याही खासगी कंपनीला परीक्षेचे टेंडर देता शासनाने या परीक्षा स्वतः घ्याव्यात आणि अतिशय पारदर्शकपणे घ्याव्यात, अशी आपली मागणी आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी हे देशाचे उद्याचे भाfवतव्य आहे या विद्यार्थ्यांना आवश्यक ती साधन, सामुग्री उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला पाहिजे, अशी आपली मागणी आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी गाव खेड्यातून शहरात येणार्या विद्यार्थ्यांच्या राहण्याची आणि जेवण्याची व्यवस्था सरकारने करावी तसेच या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीपदेखील सरकारने दिली पाहिजे, अशी आपली मागणी राहणार आहे. स्टाफ सिलेक्शन, रेल्वे भरती, पोलीस भरती, सैन्य दलाच्या भरतीची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे, प्रत्येक तालुक्यात सुसज्ज असे अभ्यास केंद्र निर्माण झाली पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे यावेळी रविकांत तुपकर यांनी सांगितले. बेरोजगार, स्पर्धा परीक्षेची तयारी, सैन्यदल, रेल्वे आणि पोलीस भरतीची तयारी करणार्या विद्यार्थी – विद्यार्थिनींनी आम्ही सर्व एकसंघपणे रविकांत तुपकरांच्या पाठीशी आहोत आणि यावेळी तरुणाई क्रांती घडवणारच असा विश्वास व्यक्त केला.
उद्या संध्याकाळी किनगावजट्टूत धडाडणार शेतकरी नेते रविकांत तुपकरांची तोफ!