– सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीचे मुख्य कार्यकारी अभियंत्यांना निवेदन
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – दुसरबीड-मलकापूर पांग्रा ते साखरखेर्डा या डांबर रस्त्याच्या कडेला एका नामांकित कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभागाची कुठलीही परवानगी न घेता, तसेच शासनाचे शुल्क बुडवून केबल टाकण्यासाठी खोदाई केलेली आहे. तसेच, शेंदुर्जन ते तांदूळवाडी फाट्यापर्यंत पाच वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली होती. ही झाडेही अवैधपणे तोडण्यात आली आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग देऊळगावराजाचे अभियंता बालाजी काबरा यांना कळवूनदेखील त्यांनी या गंभीर प्रकाराकडे कानाडोळा चालवला आहे. तेव्हा, या प्रकरणाची तातडीने चौकशी करण्यात येऊन, काबरा यांच्यावर कारवाई करावी, चौकशी कालावधीत त्यांना निलंबीत ठेवावे, तसेच संबंधित कंपनीकडून शासकीय नुकसान भरपाई व दंड वसूल करावा, अशी मागणी सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग, बुलढाण्याचे मुख्य कार्यकारी अभियंता यांच्याकडे करण्यात आली आहे. अन्यथा, या प्रकरणी लोकशाहीमार्गाने तीव्र आंदोलन व न्यायालयीन कारवाईचाही इशारा देण्यात आलेला आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे, की दुसरबीड, मलकापूर पांगरा – ते साखरखेर्डा या २२२ क्रमांक डांबर रस्त्याच्या कडेलाच एका नामांकित कंपनीने सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगावराजा यांची कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसताना, रस्त्याच्या कडेला केबल टाकण्यासाठी जेसीबीने मोठ्या प्रमाणात रस्त्याचे खोदकाम केलेले आहे. याबाबत आम्ही देऊळगावराजा उपविभागाचे अभियंता बालाजी काबरा यांना कळवले असता, त्यांनी याबाबत संबंधित कंपनीवर कुठलीही कारवाई केलेली नाही, तसेच हे अवैध खोदकामदेखील थांबवले नाही. सदर खोदकाम गेल्या दोन महिन्यापासून सुरू असून, काबरा यांनी आर्थिक व्यवहार करून या कंपनीला पाठीशी घातले असल्याचा आम्हाला दाट संशय आहे. तरी, या अवैध रस्ता खोदकामाची चौकशी करण्यात येऊन, संबंधित कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, व बालाजी काबरा यांची चौकशी करण्यात येऊन त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
तसेच, शेंदुर्जन ते तांदूळवाडी फाट्यापर्यंत पाच वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड केली होती. अजूनही दुतर्फा गर्द झाडे दिसून येतात. परंतु सदर कंपनीने झाडे तोडण्याची कुठलीही परवानगी घेतलेली नसताना ५० पेक्षा जास्त वृक्षाची तोड केली आहे. या अवैध वृक्षतोडीबाबतही बालाजी काबरा यांनी या कंपनीला पाठीशी घातलेले असावे, असा आम्हाला संशय आहे. तेव्हा रस्त्याच्या कडेची झाडे तोडली गेल्याने याही प्रकरणाची चौकशी व्हावी, व कंपनीवर गुन्हे दाखल करण्यात येऊन योग्य ती कारवाई करावी. तसेच, याप्रकरणीदेखील बालाजी काबरा यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा, आपल्या विभागाविरोधात लोकशाहीमार्गाने पुढील कार्यवाही करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असा इशाराही सार्वजनिक बांधकाम विभागाला सिंदखेडराजा-देऊळगावराजा तालुका विकास संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे. महिनाभरात याप्रकरणी कारवाई न झाल्यास, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना भेटून सविस्तर तक्रार दाखल करून, शासनाला कारवाई करायला लावू, असा इशारा समितीचे अध्यक्ष तथा पत्रकार अनिल दराडे यांनी दिलेला आहे.
————