वर्धा (प्रकाश कथले) – जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त असतानाचा फायदा घेत वाळूचे कण उपसता पैसाची गळे, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन जिल्ह्यातील वाळूघाटात वाळूउपशाचे नियम पायदळी तुडवून जोमात वाळूउपसा सुरू आहे. जेसीबीचा वापर करून होणारा हा अमर्याद वाळू उपसा जिल्हाधिकार्यांसह पोलिस अधीक्षकांनी रात्री छापा टाकून पकडला. कारवाईही झाली, पण वाळूमाफिया पुन्हा सक्रीय झाले आहे.
महसूलच्या कारवाईनंतरही या वाळूउपस्याचा देवळी तालुक्यातील मास्टरमाईंड मोकाटच असून तोच या बेकायदा वाळूउपस्याची नामानिराळे राहात सुत्रे हलवितो. देवळी तालुक्यातला हा वाळूमाफिया प्रमुख राजकीय पक्षांसोबत लागेबांध ठेवण्यात चाणाक्ष आहे.त्यातून तो वाळूउपस्याचा हैदोस घालत नद्यांचा गळा आवळतो. जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षकांनी देवळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणार्या टाकळी चणाजी, येथील वाळूघाटातल्या बेकायदा वाळूउपस्यावर कारवाई करीत इंजिन बोट,जेसीबी, पोकलॅण़्ड मशीन, ४ टिप्पर,ट्रक,२ ट्रॅक्टर, ४९ हजार ८०० रुपये रोख, ११ मोबाईल हॅण्डसेट, असा २ कोटी,१५ लाख,११ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यात २१ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टाकळी चणाजी जवळील सोनेगाव बाई डेपो क्रमांक ३ हा गुरुकृपा फ्लाय अॅश कंपनीचा असून त्याचा संचालक प्रकाश सूरकार आहे. या ठिकाणी नियमबाह्य गौण खनिजाचा उपसा करून वाळू डेपोत जमा न करता परस्पर वाहतूक करून शासनाची फसवणूक केली जात असल्याचे जिल्हाधिकार्यांना दिसले. येवढ्या मोठ्या प्रमाणातला हा बेकायदा खुला कारभार देवळी पोलिसांनाच काय,पण तेथील महसूललाही दिसत नव्हता.अखेर जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षकांना रात्री जात ही कारवाई करावी लागली.
जी आणखी माहिती समोर येत आहे,त्यानुसार साती, सालफळ, गुंजखेडा, कांढळी, मनगाव,मांडगाव, येळी,चिंचोली, सावंगी रिठ, पारडी,सोनेगाव,रोहणी परिसरातही असाच वाळूमाफियांचा उच्छाद सुरू आहे.जेसीबीच्या वापरातून खुलेआम वाळूचा उपसा करीत नदीपात्र पोखरून काढले जात आहे. यातील काही वाळू समृद्धी महामार्गाने अमरावती जिल्ह्यात पोहोचविली जाते. खणीकर्म विभाग लिफापे स्वीकारत पांघरून घालतो, सारे ठरवून केले जाते. इकडे चला जाणू या नदीला मोहीम तर दुसरीकडे चला कंगाल करू या नदीपात्राला,अशी मोहीम, असा संगनमताचा दुतोंडी कारभार सुरू आहे.या वाळूउपस्याचा मास्टरमाईं़ड दुरुन पहात नामानिराळा राहातो,हेच त्याचे यश आहे.