`माझ्या जीवींची आवडी| पंढरपुरा नेईन गुढी ||१||
पांडुरंगी मन रंगले| गोविंदाचे गुणी वेधिले ||2||
जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे| पाहतां रूप आनंदी
आनंद साठवे ||३||
बापरखुमादेविवरु सगुण निर्गुण| रूप विटेवरी
दाविली खुण ||४||´
श्री संत ज्ञानेश्वर महाराजांना पंढरपूरला वारील जाण्याची मनापासून आवड होती. त्यांच्या घराण्यात ही पंढरपूरच्या वारीची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली होती. त्यांनी सर्व संत मेळ्याला बरोबर घेऊन ही वरीची परंपरा अधिक व्यापक प्रमाणात वाढविली होती. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी व थोरले बंधू निवृत्तिनाथ हे ही पंढरीचे वारकरी होते. संत ज्ञानेश्वर महाराजांना, त्यांनी पंढरीचा मार्ग दाखविला व सांगितला होता. त्याच मार्गाने त्यांच्या समकालीन संत गेले होते.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधी नंतर, संत एकनाथ महाराज, संत तुकाराममहाराज, संत नारायण महाराज, संत निळोबाराय, संत हैबतबाबा, त्यानंतर स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज, प्राचार्य मामासाहेब दांडेकर इत्यादींनी त्यामध्ये फार मोठी मोलाची भरच घातली. ही वारीची परंपरा फार जुनी आहे. ती आजतागायत चालू आहे.
‘ज्ञानोबा माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम’
हे शब्द कानावर आले की दिंड्या-पताका आणि पालखीबरोबर पंढरीला पायी वारी करण्यासाठी चाललेले वारकरी आपल्या नजरेसमोर येतात. टाळ-मृदंगाचा गजर करीत. हरिनामाचा जयघोष करीत. भजनामध्ये दंग होऊन ही अभंगाची बरसात करीत असतात. देशाच्या कानाकोपऱ्यातून विठुरायाच्या नगरीमद्ये पोहोचतात. हा एक विशेष आहे. ही वारकऱ्यांची संख्या लाखोंनी असते. श्री विठ्ठलाविषयी श्रद्धा बाळगून जाणाऱ्या या जनसागरांकडे पाहून भक्तीचा गंगेला महापूर आला आहे, असे निश्चितपणे म्हणावेसे वाटते.
श्री संत ज्ञानेश्वर महाराज, संत मुक्ताबाई महाराज, श्री संत निवृत्ती महाराज, श्री संत सोपान देव, श्री संत तुकाराम महाराज, श्री संत गजानन महाराज, इत्यादी अशा अनेक दिंड्या पंढरीत एकत्र येतात. हा एक विश्वातील अपूर्व सोहळा आहे. तो प्रत्येकाने एकदा तरी पाहावा व अनुभवावा असाच आहे.
‘अवघाची संसार सुखाचा करीन| आनंदे भरीन तिन्ही लोका ||१||
जाईन गे माये तया पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया||२||
संत ज्ञानेश्वर महाराजांनी विश्व सुखी करून आनंदाने भरण्याची व पंढरीला जाण्याची प्रतिज्ञा केली होती. संत नामदेव महाराज यांनी
`नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी||´
हे ध्येय उराशी बाळगून पंढरी पासून पंजाबपर्यंत प्रवास केला होता. संत सावता महाराजांना, `कांदा मुळा भाजी| अवघी विठाबाई माझी||´ असा साक्षात्कार झालेला होता. संत एकनाथ महाराजांना, `माझे माहेर पंढरी | आहे भिवरेच्या तीरी||´ असेच वाटत होते. संत चोखोबाराय म्हणतात माझे मन व चित्त्त पंढरीलाच स्थिर झाले. त्यांच्या मनाला समाधान लाभले. श्री संत तुकाराम महाराजांनी ही पंढरीची वारी आपल्या वडिलांची मिरासी असे मानलेले आहे. माझ्या `वडिलांची मिराशी | गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा||´ किंवा `होय होय वारकरी| पाहे पाहे रे पंढरी||´ `पंढरीचे वारकरी | ते आधिकारी मोक्षाचे||´ ´पंढरीची वारी आहे माझ्या घरी| आणिक न करी तीर्थव्रत||´ संत तुकाराम महाराजांच्या मनाची ही धारणा होती. जन्माला आल्यावर एकदा तरी माणसाने वारकरी होऊन पंढरी पाहावी. पंढरीचे वारकरी हे मोक्षाचे अधिकारी बनतात.
वारकरी म्हणजे षडरिपूवर वार करणारा. विकारावर वार करणारा. वारकरी म्हणजे मनात येणाऱ्या दुर्गुणांच्या विरुद्ध लढणारा वीर होय. वारी म्हणजे उपास्य देवतेकडे पुन्हा पुन्हा जाणे- येणे होय. आळंदी- पंढरीला जाणाऱ्यांना वारकरी असे म्हणतात. वारकरी होण्यासाठी त्याग करण्याची तयारी असावी लागते. नि:स्वार्थ भाव मनामध्ये असावा लागतो. मनामध्ये, शरीरात सहनशीलता ही असावी लागते. एक निष्ठा असावी लागते. विकारापासून- व्यसनापासून दूर राहण्याची तयारी असावी लागते. जीवन स्वयं संयमी असावे लागते. ही सर्व तयारी शेतकऱ्यांच्या शेतात उन्हा- तान्हात, थंडी- वाऱ्यात, उन्ह- पावसात काम करणाऱ्या शेतकऱ्यांची असते. म्हणून ते वारकरी होऊ शकतात.
या वारीच्या पालखी सोहळ्यात कसलेही कर्मकांड नसते. नुसते एकच कोणी या सोहळ्याचा मालक नाही. इथे एकाधिकारशाही नाही. सर्व समान पातळीवर असतात. विश्वऐक्य, बंधुभाव, समता सर्वत्र नांदताना दिसते. कोणत्याही कारणावरून वारीत भेदभाव पाळला जात नाही. आपण विठ्ठलाची लेकरे आहोत. तो आपला पिता आहे. हीच धारणा असते. ही विश्वातील सर्वात मोठी जाती निरपेक्ष संघटना ही सर्वच दिंड्यांमध्ये भक्त भाविक, स्वयं संयम आणि शिस्त पाळतात. `येथे मनाचा मारू न करिता| इंद्रियाही दुःख न देता| येथे मोक्ष असे आइता | श्रवणाची माझी||´
म्हणजेच इथे मनाला मारण्याची, इंद्रियांना दुःख देण्याची गरज नाही तर भजन-कीर्तन, नामस्मरण यातच मोक्ष आहे. तेव्हा भाविक- भक्तांनी,
जाणकारांनी जागृत राहून विचार करण्याची वेळ आलेली आहे.
शेतकऱ्यांचे अंतरंगविश्व वेगळे आहे. शेतात काम करून वर्षभर कोमेजलेल्या मनाला ताजेतवाने, प्रसन्न, सत्त्वयुक्त, आनंदी, शरीर व मन प्रसन्न करण्याची वारी एक अमृत संजीवनी देणारे साधन आहे. एक उर्जाशक्ती आहे. एक जिवंत झरा आहे. तो महासागर आहे. त्यामध्ये आपण स्नान करून पुण्य पदरात पाडून घ्यावे. कोणत्याही व्यक्तिपूजेच्या मागे लागू नये. वारीच्या संस्कृती उत्सवाचे संवर्धन करावे आपले जीवन सुखी आणि समृद्ध, संपन्न करावे. दुसरे यापेक्षा मानवी जीवाला हवे तरी काय असते?