नंदुरबार (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या २४ तासात नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर आज सकाळपासूनच खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी कृषी सेवा केंद्रांवर दिसून येत आहे. एकूणच सव्वा महिन्याच्या प्रतीक्षेनंतर नंदुरबार जिल्ह्यात समाधानकारक पावसाने हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नंदुरबार, शहादा, नवापूर, तळोदा, अक्कलकुवा या शहरात कृषी सेवा केंद्रांव खत बियाणे आणि विविध शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील शेतकरी सकाळपासूनच गर्दी करत आहेत.
आता ग्रामीण भागात पेरणीची लगबग दिसून येणार आहे. यावर्षी सोयाबीन, कापूस आणि मका पिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचे चित्र दिसून येत आहे. मिळेल त्या वाहनाने खते आणि बियाणे आपल्या गावापर्यंत पोहोचवण्याची लगबग जिल्ह्यात सर्वत्र पाहण्यास मिळत आहे. जिल्ह्यात पावसाने असेच सातत्य कायम ठेवावे अशी अपेक्षा बळीराजांनी व्यक्त केली आहे.