– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली : चंद्रकांत रघुवंशी
नंदुरबार (आफताब खान) – शिवसेनेचे स्थानिक नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने व या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने नंदुरबारसह खान्देशात एकच खळबळ उडाली आहे. रघुवंशी हेदेखील शिंदे यांच्या गटात गेले की काय? असा प्रश्न उपस्थित होऊन कट्टर शिवसैनिक अस्वस्थ झाले होते. परंतु, खुद्द रघुवंशी यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगून, शंकाकुशंकांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील शिवसेनेचे स्थानिक नेते व माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरली होती. मात्र नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या विविध कामांसाठी मंत्रालयात फेर्या सुरू असतात, त्यात सर्वपक्षीय आमदारांसोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, ही सदिच्छा भेट होती. आपण शिवसेनेसोबत असून, जिल्ह्यातील शिवसेना एक संघ असल्याचे रघुवंशी यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर जिल्ह्यातील शिवसेना खरोखरच एकसंघ आहे का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
—-
Leave a Reply