आळंदी (प्रतिनिधी) – महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांची महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सर्वानुमते निवड जाहीर करण्याची मागणी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे, खासदार कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे केली आहे.
अजितदादा पवार हे राज्यातील लोकप्रिय नेते असून, ते अनुभवी व सक्षम नेते आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रीपद व विरोधी पक्षनेते पद भूषविले आहे. त्यांची राज्याच्या प्रदेशाध्यक्षापदी निवड केल्यास राजकीय परिवर्तन निश्चित घडेल. ते संपूर्ण राज्यात, खेडोपाडी सर्वसामान्य कार्यकर्ते व जनता त्यांना ओळखत असून, त्यांचा जनसंपर्कदेखील मोठा आहे. त्यामुळे त्यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षपदी निवड केल्यास आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हापरिषद, पंचायत समिती, नगरपरिषदा, ग्रामपंचायत तसेच इतरही निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश मिळेल. पक्षसंघटना बळकट करण्यासह राज्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी अजितदादांची राज्याचे प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून, पक्षाची धुरा त्यांच्याकडे तात्काळ सुपूर्द करण्यात यावी, अशी मागणी शहर उपाध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे केली आहे.