बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) – महावितरणच्या गलथान कारभारामुळे किनगावजट्टू येथे मोठी दुर्घटना टळली असली तरी, श्रीराम आश्रुजी गायकवाड यांचा सुमारे एक लाख रूपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. खांबावरील तार तुटून गोठ्यावर पडल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने ही दुर्देवी घटना काल (दि.२७) रोजी घडली. या शेतकर्याला तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी पुढे आली आहे.
दुसरबीड शेतरस्त्यावर किनगावजट्टू येथील शेतकरी श्रीराम आश्रुजी गायकवाड यांचे शेत आहे़. त्यांनी शेतातच गोठा, कांदा चाळ बांधलेली आहे. त्यांच्या घराजवळ असलेल्या विद्युत डीपीची तार तुटली व गायकवाड यांच्या चाळीवर कोसळली. जीवंत विद्युत प्रवाह असलेल्या या तारेमुळे गोठ्यात शॉर्टसर्किट झाले व आग लागली. त्यामुळे घरातील जवळपास दहा ते पंधरा क्विंटल कापूस जळून खाक झाला. या आगीत गायकवाड यांचे एक ते सव्वालाखाचे नुकसान झालेले आहे. तसेच, केवळ नशीब बलवत्तर म्हणून जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच तलाठी वसुदेव जायभाये यांनी घटनास्थळावर धाव घेऊन पंचनामा केला. यावेळी ज्ञानेश्वर कायंदे, कोतवाल मधुकर मिसाळ आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
————–