विश्वी विठ्ठल विस्तारला! रिता ठाव कुठे नाही उरला!!
आळंदी (अर्जुन मेदनकर) – महाराष्ट्र भूमीवरील आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा आता साता समुद्रा पार न्यू जर्सी या ठिकाणी प्रतिष्ठित झाला आहे. न्यू जर्सी मध्ये मंदिर उभारण्याकामी जामनेर तालुक्याचे सुपुत्र तेथील स्थायिक झालेले तरुण उद्योजक श्री.प्रवीण पाटील, श्री भालचंद्र कुलकर्णी मुंबई, आनंद चौथाई पुणे या दोन मित्रांच्या सहकार्यातून स्टिवसेंट अवे लिंधर्स्ट न्यू जर्सी या ठिकाणी पांडुरंग परमात्म्याच्या मूर्तीची दिनांक २१ मे रोजी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. दिनांक २९ जून रोजी यंदाची आषाढी एकादशी असून या एकादशीच्या मुहूर्तावर अमेरिकेत राम कृष्ण हरी आणि ज्ञानोबा तुकाराम नाममंत्राच्या घोष दुमदुमणार असून, थेट अमेरिकेत आषाढी वारी साजरी करण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू झाली आहे. यावर्षीच दिनांक ३ एप्रिल रोजी शिकागो या ठिकाणी महाराष्ट्रीयन तरुण उद्योजकांनी पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून मंदिराची उभारणी केली. त्यापाठोपाठ आता न्यू जर्सी या ठिकाणी सुद्धा पांडुरंगाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून भविष्यात जवळपास दहा एकर भूभागावर मंदिर उभारणीचे कार्य आरंभ केले जाईल, अशी माहिती श्री.प्रवीण पाटील यांनी अमेरिकेतून प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
पांडुरंग परमात्म्याचे विठ्ठल मंदिर उभारण्यामागे महाराष्ट्रीयन असलेल्या या तीन तरुण उद्योजकांचा मोठा संकल्प आहे. विठ्ठल रुक्मिणी मूर्ती आणि मंदिराच्या माध्यमातून अमेरिकेत स्थायी झालेल्या महाराष्ट्रीयन आणि भारतीय मंडळींना एकत्रित आणणे, महाराष्ट्राचे थोर संत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे विचार तरुण आणि बालकांच्या पुढे प्रसार आणि प्रचारित करणे, परक्या देशात राहून सुद्धा भारतीय संस्कृतीचे अध्ययन करणे, बालकांवर आणि तरुणांवर भक्तीचे संस्कार करणे या व्यापक उद्दिष्टातून विठ्ठल मंदिर निर्माण कार्य हाती घेण्यात आले आहे. न्यू जर्सी मध्ये २१मे २०२३ रोजी विठ्ठल आणि रखुमाईच्या मूर्तींची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. हे मंदिर सर्वांसाठी अमेरिकन स्टॅंडर्ड टाईम नुसार सायंकाळी पाच ते रात्री साडेआठ पर्यंत दर्शनासाठी उघडे राहणार आहे. श्री विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती पंढरपूर येथून अमेरिकेत मागविण्यात आली असून जवळपास अडीच फुटाची ही विलोभनीय मूर्ती आहे.
सोबतच २९ जून २०२४रोजी येणारी आषाढी एकादशी भक्ती भावाने साजरी करण्यासाठी वारीचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रीयन आणि भारतीय भाविक भक्तांनी आषाढी वारीत मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन यानिमित्ताने करण्यात आले आहे. न्यू जर्सी या ठिकाणी दहा एकर जमीन विकत घेऊन जवळपास २० हजार स्क्वेअर फुट मध्ये भव्य दिव्य विठ्ठल मंदिर स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती श्री.प्रवीण पाटील यांनी दिली. या मंदिराबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इंटरनेटवर एक संकेतस्थळ स्थापन करण्यात आली असून त्याचा पत्ता https://www.vitthalmandirus.org/ असा आहे. महाराष्ट्रातील अमेरिकेत स्थायिक झालेल्या मराठी जणांनी वरील मंदिराला अगत्याने भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले असून स्वच्छेने मंदिर निर्माण कार्यासाठी तन मन धनाने मदत करणाऱ्यांचे स्वागत आहे असे प्रवीण पाटील , कुळकर्णी आणि श्री. चौथाई म्हणाले. या दैविकार्याचा मोठा वाटा उचललेले मुंबई येथील श्री भालचंद्र कुलकर्णी आणि पुणे येथील आनंद चौथाई यांचे अनमोल सहकार्य मिळत आहे. अमेरिकेत स्थायिक झालेले प्रवीण पाटील हे मूळ जामनेर तालुक्यातील सोनाळा येथील रहिवासी असून जामनेरच्या न्यू इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.जे.डी. पाटील यांचे सुपुत्र आहेत. धार्मिक आणि परमार्थाचे धडे त्यांना त्यांच्या आजोबापासूनच घरी मिळाले आहे. सोनाली ग्रामस्थांनी अवलिया अवली बाबा यांचे मोठे मंदिर सोनाळे गावी बांधले असून या देवस्थानचे अध्यक्ष श्री जे. डी .पाटील आहेत. वडिलांच्या भक्तीचा वारसा पुढे नेण्याचे काम ईश्वरीय आदेशानुसार आम्ही करत असल्याची भावना श्री. प्रवीण पाटील यांनी व्यक्त केली.
दिंडी सोहळा कसा असावा?
अमेरिकेतील न्यू जर्सी स्टेट मध्ये पहिल्यांदाच पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. “विश्व विठ्ठल विस्तारला !रीता ठाव कुठे नाही उरला!”या उक्तीनुसार जळी स्थळी चराचरात वास्तव्य असणारा पांडुरंग परमात्मा आता सगुण मूर्तीच्या स्वरूपात अमेरिकेत दाखल झाले आहे. येथे पहिल्यांदाच आषाढी वारी ग्लोबल स्वरूपात साजरी करण्यात येणार आहे. वारीचे स्वरूप कसे असावे? याविषयी श्री. प्रवीण पाटील यांनी आमच्याशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले आहे.२९ जून रोजी यंदा आषाढी वारी असून अमेरिकेत पहिल्यांदाच महाराष्ट्रीयन भाविक भक्त ह्या वारी सोहळ्यात मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असून ते वारीचा अनुभव घेणार आहे.