Uncategorized

‘वृत्तदर्पण’.. ९००व्या भागानिमित्ताने !

शब्द सुरातला असो की, उरातला..
काळजातून जेंव्हा तो कागदावर उतरतो,
तेंव्हा एक शब्दशिल्प निर्माण होत असते.

वृत्तदर्पण अशाच शब्दांच्या माथमातून तयार झालेलं एक वृत्तात्मक शब्दशिल्प. १८ वर्षापूर्वी आकाराला घातलेले हे वृत्तशिल्प, ९०० आठवड्यांचा अखंड व अविरत वृत्तप्रवासानंतर एका गौरवपूर्ण टप्यावर पोहोचले. त्याचेच हे सिंहावलोकन..

हा प्रवास सोपा नव्हता..
या सर्व ९०० ‘वृत्तदर्पण’ मध्ये एकदाही माझ्याविषयी ‘मी’ असा कधीही उल्लेख झालेला नाही. तसंही पत्रकारानं आत्मकथन करायचं नसतं, तो चालत अन् धावत असतो.. इतरांसाठीच. पत्रकारांनी स्वतःच्या वेदना कथन करायला आरंभ केला की समाज त्याच्याकडे संवेदनाहिन नजरेनं बघु लागेल. म्हणतात ना, पत्रकारीता हे सतीचं वाण आहे. सुळावरची पोळी आहे.. म्हणूनच सामाजिक वेदनेची सल जिथे उमटते, तिथेच पत्रकारीता अस्सल होते.

जगण्याचा किंवा पत्रकारीतेचा प्रवास इथं मांडत नाही. कथन करतो तो फक्त ‘वृत्तदर्पण’ मालिकेचा प्रवास.. तोही आत्मकथनाचा दोष पत्करून !

मोबाईलमध्ये ‘सेल्फी’ नावाचा प्रकार आला, अन् आपला फोटो घेण्यासाठीही दुसर्‍याची गरज उरली नाही. या ‘सेल्फी’मुळे जो-तो स्वतःत मग्न दिसत असतांना, ‘सेल्फीश’ वृत्ती वाढीला लागू नये.. एवढीच अपेक्षा.

‘तुका म्हणे होय मनाशी संवाद..’ हा एक ‘सेल्फी’चाच प्रकार. बाह्यरंग मोबाईलमध्ये क्लिक करता येते, पण अंतरंग टिपण्यासाठी अंतःकरण क्लिक होणंच गरजेचं. दुसर्‍यानं आपल्याकडे पाहतांना आपल्याला लाज वाटलीतरी चालेल, पण स्वतः स्वतः कडे पाहतांना लाज वाटायला नको.. यालाच जगणं म्हणतात. माझ्यात न्युनगंड होता, बोलताना अडखळण्याचा खूप अवघडसारखं व्हायचं, दुसऱ्यांशी बोलतांना. त्यामुळे आतून खचत चाललो होतो. पण व्यक्त होण्याच्या जमान्यात बोलण्यातून अभिव्यक्तच होता येत नसेल तर, करावं तरी काय? हा प्रश्न होताचं. पण त्याला उत्तर मिळालं, लेखणीच्या माध्यमातून..
‘सोडली कधी ना मी पायरी आहे,
आयुष्य माझे खुली डायरी आहे..
शाईत मिजवलेली अक्षरे नाही,
रक्तात बुडवलेली शायरी आहे !’
याप्रमाणे व्यक्त होत गेलो. ‘देशोन्नती’मध्ये काम करतांना प्रकाशभाऊ पोहरेंसारखा आधार व राजेशजी राजोरे साहेबांसारखा मार्गदर्शक मिळाला.

ठरलं साप्ताहिक स्तंभ सुरु करायचं. त्यावेळी वार्तापत्रांचा दिवस होता, रविवार. मग आपला वार कोणता ? परंपरागत रविवारची चौकट मोडून ठरवला, सोमवार.. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मागच्या आठवड्यातील सर्वांगीण आढावा हा ‘वृत्तदर्पण’चा विषय ठरवला. सुरु झालं, सुक्ष्म निरीक्षणासाठी ‘लोगो’ ठरला, भिंगात क्रमांक टाकण्याची कल्पना संगणकचालकाला सुचली. तेंव्हा वार्तापत्रात घटनेचे फोटो नसायचे, फोटो घेवून त्याखाली काव्यात्मक चार ओळी सुरु केल्या. ‘वृत्तदर्पण’ वाचकांना आवडत गेलं, तसे फोन येऊ लागले. त्यामुळे उत्साह वाढत गेला. सलग २५ आठवडे जेंव्हा पूर्ण झाले, त्यावेळी थोडी छाती फुगून आली होती. पण फुगलेल्या फुग्याला टाचणी लागावी अन् क्षणार्थात हवा जावी, तसं माझं झालं. २५व्या भागावरुनच एका राजकीय नेत्याकडून संपादकाकडे माझी गंभीर तक्रार झाली. विषय निशांत टॉवरपुढे उपोषणाचा इशार्‍यापर्यंत पोहचला. आता आपली ‘देशोन्नती’मधून गच्छंती अटळ, म्हणून गलीतगात्र झालो. पण रोखठोक विषय त्यात मिश्लीलपणा असलातरी, तो व्यवस्थित मांडला म्हणून प्रकारभाऊ अनू राजोरे साहेब समर्थपणे पाठीशी उभे राहिले. तेंव्हा मात्र झालं ते झालं, ते तुझं ते ‘वृत्तदर्पण’ बंद कर.. असं ते म्हणतील, असं वाटलं होतं. पण त्यांनी उलट सदराला प्रोत्साहन दिलं. ते पुढे चालू राहिले. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, अध्यात्मिक, क्रीडा, कला, साहित्य, काव्य.. आदी विषयावर विषय मिळत गेले अन् लेखणीला धार येत गेली. निवडणुकांचा माहौलमध्ये जोर चढायचा.

‘वृत्तदर्पण’ तयार करतांना सण-उत्सव असले की, त्या माध्यमातून त्यांचा इतिहास व वर्तमान असा अभ्यासपूर्ण लेखाजोखा मांडतांनाचा आनंद वेगळाच. तर एखाद्या दुदैवी घटनेवर भाष्य करतांना शब्द आधी काळजाला फुटणारे पाझर हृदय हेलावून सोडायचे, सेवाभावी वृत्तीने काम करणार्‍या सामाजिक संस्थाना ‘वृत्तदर्पण’ च्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम करता आले. लोकजागर, प्रश्नचिन्ह, सेवासंकल्प अशा वैविध्यपुर्णतेचा त्यात सहभाग. अंध, अपंग, मतिमंद मुलांचे ‘स्वरावनंदन’ चा भाग झंकारणारा ठरला, स्त्रीभ्रुणहत्येविरोधात वृत्तदर्पणातून ‘लेक माझी’ची ज्योत पेटवता आली. अशा विविध भागांच्या खूप आठवणी यानिमित्ताने प्रकर्षानं आठवल्याशिवाय राहत नाही.

काळोखातही उजाडणारी पहाट कधी थांबणार नसते, रात्रीच्या गर्भातच उषःकालाची बिजे रोवली जातात. सुर्यात पृथ्वीला प्रकाशमान करण्याची क्षमता असते, पण अंधाराला उजळविण्यासाठी एक इवलीशी पणतीही पुरेसी असते. सध्या जग विज्ञान-तंत्रज्ञानानं प्रकाशमान होत असतांना, विकासाच्या नावाखाली प्रगतीच्या क्षेत्रात मात्र काळोख पसरतोय. विवेकावर अविवेकाचा अतिरेक झाल्यामुळे सर्वच क्षेत्रात गडद अंधार दिसतो. राजकारणाचा धंदा झालाय, सहकाराचा स्वाहाकार झाला, शैक्षणिक संस्थांनी बाजार मांडलाय तर सामाजिक क्षेत्राला प्रसिध्दीचा रोग जडू पाहतोय. जीवनाशी संबंधीत विविध क्षेत्रात वेगवेगळ्या प्रकारचा अंधःकार पसरत असतांना ‘वृत्तदर्पण’ केवळ एक पणती म्हणून पुढं आलंय. त्यातून अपप्रवृत्तीवर प्रहार करतांना चांगल्या प्रवृत्ताना उजाळा देण्याच काम करता आलं, येत आहे.. याचंच खरं समाधान वाटतं. आयुष्य ओढतांना झालेल्या दमछाकीत अंतरे जोडण्याचं काम यातून योगायोगानं करता आलं, यात धन्यता वाटते.

योगाची श्रृंखला पहा- १००वा भाग जिल्हा विकासासाठी ‘साथी हाथ बढाना’, २००वा भाग तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताईंच्या बुलडाणा भेटीअनुषंगानं ‘ज्योत से ज्योत जलाते चलो’, ३००वा भाग अक्षरलेणं पुस्तक प्रकाशनावर ‘ज्योतीने तेजाची आरती’, ४००वा भाग सेव्हन वंडर्स ऑफ महाराष्ट्रमध्ये लोणारच्या खार्‍या पाण्याचं सरोवर हे पहिलं आश्चर्य ठरले त्याविषयीचं ‘आश्चर्य’, ५००वा ‘पाऊले चालती..’ हा आषाढी वारी अनुषंगाने आलेला भाग, ६००वा केवळ शरीर व मनचं नव्हेतर जगाला जोडणार्‍या ‘योग दिवस’ यावर घेता आलेला भाग, ७००वा ‘माँ तुझे सलाम’ हा मातृशक्तीच्या सन्मानाचा भाग, कोरोना काळात ८००वा ‘प्राणवायू’ या विषयावर झालेला भावविव्हळ भाग तर तर आता ९००वा ‘महाराष्ट्र दिन’ या विषयावरील गौरवपूर्ण भाग !

९००वा भाग, म्हणजेच ९०० आठवडे. १८ वर्षाचा हा मोठा काळ. ‘देशोन्नती’ मध्ये २६ वर्षापासून काम करतांना, तत्पुर्वीही ‘सडेतोड’ नावाचं वार्तापत्र सुरु होतं. पण त्याचा निश्चित वार अन् क्रमवारी ठरलेली नव्हती. अनेक प्रासंगीक वार्तापत्र अन् राजकीय वार्तापत्रही तशी चालूच होती अन् आहेतही. मुख्य आवृत्तीसाठी जिल्ह्याच्या राजकारणावर ‘राजरंग’ प्रकाशीत होतच असते. वार्तापत्राचा हा वृत्तप्रवास वाचकांच्या वाचनसहकार्यावर सदोदीत सुरु आहे. वृत्तदर्पण ही वृत्तमालिका त्याचाच एक भाग, १ मे च्या सोमवारी अखंडपणे अविरत साधना ठेवून ‘वृत्तदर्पण’ने ९००वा गौरवपुर्ण टप्पा गाठला. हा टप्पा गाठण्यास मिळालेल्या वाचकांच्या सहकार्याबद्दल खरंच मनापासून कृतज्ञता वाटते, एवढंच!

(लेखक हे विदर्भातील आघाडीचे दैनिक ‘देशाेन्नती’चे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी तथा ज्येष्ठ पत्रकार व ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे सल्लागार संपादक आहेत. संपर्क – ९८२२५९३९२३)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!