बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या ९ एप्रिलरोजी मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशासह परिसरात रात्रभर वादळ व गारांसह तुफान अवकाळी पाऊस झाला होता. यामुळे झालेल्या नुकसानीची आज, १२ एप्रिलरोजी मेहकर-लोणार मतदारसंघाचे आमदार ड़ॉ. संजय रायमुलकर यांनी शिवार फिरून पाहणी केली व एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा धीर दिला.
अवकाळी पाऊस यावर्षी जिल्ह्याचा पिच्छा सोड़ायला तयार नाही. गेल्या मार्च महिन्यात जिल्ह्यात तुफान पाऊस पड़ला तर आता एप्रिल महिन्यातही अवकाळी पावसाचा जोर आहेच. यामुळे रब्बी व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले. मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा, पारखेड़, मांड़वा, मोहना यासह इतर भागात ९ एप्रिलच्या रात्री रात्रभर वादळ व गारासह तुफान पाऊस झाला. यामुळे कांदा, टोळकांदा, उन्हाळी सोयाबीनसह फळबागांचे मोठे नुकसान झाले तर काही ठिकाणी जीवितहानीसुध्दा झाली. त्यामुळे शेतकरी पूर्णतः खचला आहे.
आज,१२ एप्रिलरोजी आ. डॉ. संजय रायमुलकर यांनी देऊळगाव साकरशा येथील गणेश गायकवाड यांच्या फळबागेची तसेच पारखेड़, मांड़वा, मोहना येथील नुकसानीची प्रत्यक्ष शिवारात जाऊन पाहणी केली व मदतीपासून नुकसानग्रस्त एकही शेतकरी वंचित राहणार नाही, असा धीर दिला. यावेळी तहसीलदार संजय गरकल, गटविकास अधिकारी पांढरे, प्रभारी तालुका कृषी अधिकारी काळे, सहाय्यक बीड़ीओ मेटांगळे, मोतीचंद राठोड़, देऊळगाव साकरशाचे सरपंच संदीप अल्हाट, मोहनाचे उपसरपंच सुरेश आड़े, रणजीत देशमुख, देविदास समुद्रवार यांच्यासह संबंधित गावचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, शेतकरी उपस्थित होते.