– भक्तीला वाचविण्यासाठी सरसावले होते हजारो दानशुर हात
– हिवरा आश्रम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार, जनमाणस गहिवरले
मेहकर (रवींद्र सुरूशे) – मेहकर ते हिवरा आश्रम मार्गावरील नांद्रा धांडे फाट्यानजीक १ एप्रिलरोजी ट्रकचालकाने चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात गजानन पांडुरंग म्हस्के (वय ४६) रा. हिवरा आश्रम यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर भक्ती गजानन म्हस्के (वय १२) ही मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पीटल येथे उपचार सुरू असताना, आज तिची मृत्युशी झुंज संपली आहे. म्हस्के कुटुंबीयांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व घरातील कर्ता व्यक्तीच गेल्याने, भक्तीच्या उपचारासाठी लागणारा 15 लाखांपैकी 11 लाख रुपयांचा निधी अनेक दानशुर हातांनी उभा केला होता. परंतु, काळाने अखेर कु. भक्तीवर घाला घातलाच असून, वडिलांपाठोपाठ भक्तीनेदेखील सर्वांचा निरोप घेतला आहे. या दुर्देवी घटनेने हिवरा आश्रम, ब्रम्हपुरी या गावांसह मेहकर तालुक्यात प्रचंड हळहळ व्यक्त केली जात आहे. सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भक्तीच्या पार्थिवावर शाेकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रचंड प्रमाणात उपस्थित असलेले जनमाणस गहिवरून गेले होते. अकरा दिवसाच्या फरकाने बाप लेकीचा झालेला करुण अंत सर्वांनाच वेदना देणारा ठरला. भक्तीच्या पश्चात आई, एक भाऊ, एक बहीण, काका असा आप्त परिवार आहे.
दिनांक १ एप्रिल २०२३ रोजी दुपारी पावणेपाच वाजेच्या सुमारास दुचाकीने मेहकरहून हिवरा आश्रमकडे जात असताना नांद्रा धांडे फाट्यानजीक एका आयशर ट्रकने गजानन म्हस्के यांना चिरडले होते. या भीषण अपघातात गजानन म्हस्के हे जागीच ठार झाले होते, तर सोबत असलेली त्यांची मुलगी कु. भक्ती ही गंभीर जखमी झाली होती. तिला तातडीने छत्रपती संभाजीनगर येथील एशियन हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. अपघातामुळे भक्तीच्या प्रकृतीत गुंतागुंत निर्माण झाली होती, तसेच जीवरक्षा प्रणालीवर होती. तिच्यावर काही शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. तिच्यावर वैद्यकीय उपचारापोटी तब्बल १५ लाखांची गरज होती. तर म्हस्के कुटुंबीयांची परिस्थिती अत्यंत हलाखीची व त्यातच कर्ता पुरूष गेल्याने हे कुटुंब खचलेले होते. तथापि, हिवरा आश्रम, ब्रम्हपुरी, मेहकर येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार यांनी पुढाकार घेऊन समाजातून पैसा उभा करण्याचा प्रयत्न केला. पै अन् पै जमा करण्यात आली. गेल्या दहा दिवसांत तब्बल ११ लाख रुपये जमा झाले होते. तसेच, समाजातील अनेक दानशुर हात मदतीसाठी धावतच होते. त्यामुळे १५ लाखाचा निधी जमा होणारच होता. डॉक्टरांनी भक्तीला वाचविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तिचे शरीरही उपचाराला प्रतिसाद देत असताना आज अचानक सकाळी भक्तीच्या हृदयाचे ठोके थांबले आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. भीषण अपघातानंतर ११ व्या दिवशी कु. भक्तीने मृत्यूशी झुंज थांबवली होती. भक्तीच्या निधनाची बातमी ज्येष्ठ पत्रकार सिद्धेश्वर पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देताच मेहकर तालुक्यात एकच हळहळ व्यक्त केली जात होती.
दरम्यान, वैद्यकीय सोपस्कार पार पडल्यानंतर कु. भक्ती हिचा मृतदेह रूग्णालय प्रशासनाने कुटुंबीयांच्या हाती दिला, तेव्हा सर्वांच्या आश्रुचा बांध फुटला. भक्तीच्या पार्थिवावर हिवरा आश्रम येथे सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी हिवरा आश्रम, ब्रम्हपुरीसह पंचक्राेषीतील बहुसंख्य स्त्री-पुरूषांची उपस्थिती हाेती. यावेळी जनमाणस गहिवरून गेले होते.
पश्चातापातून आयशर ट्रकचालकाचीही आत्महत्या
1 एप्रिल 2023 रोजी ज्या आयशर वाहनाच्या धडकेने गजानन पांडुरंग यांचा जागीच मृत्यू झाला. आणि भक्ती गंभीर जखमी झाली होती. त्या आयशरच्या चालकाने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपली. आपल्या हातून एक निष्पाप जीवाचा बळी गेला व मुलगी गंभीर जखमी झाली याचे दुःख सहन न झाल्याने पश्चातापाच्या भावनेतून ३६ वर्षीय अरुण हरिभाऊ वानखेडे (राहणार कुकसा तालुका रिसोड) यांनी चार एप्रिल रोजी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, बारा वर्षाचा मुलगा व आई-वडील आहेत. या एका अपघाताने तीन जणांचा बळी जाऊन दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.