काल ठाकरे पवारांच्या भेटीला; उद्या काँग्रेस नेते ठाकरेंच्या भेटीला!
– सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरचा ‘प्लॅन बी’ तयार!
मुंबई (प्राची कुलकर्णी) – राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा फैसला कोणत्याहीक्षणी येण्याची शक्यता पाहाता, राज्यात राजकीय भेटीगाठी आणि घडामोडींना वेग आला आहे. काल रात्री शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर, आता काँग्रेसचे राष्ट्रीय नेते के. सी. वेणुगोपाल हे उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. २०२४ च्या निवडणुकांच्या अनुषंगाने ही भेट प्रस्तावित असून, या भेटीत निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी दिली. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरल्यास अजित पवार हे आपल्या आठ समर्थक आमदारांसह भाजपला पाठिंबा देणार असल्याची जोरदार चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानीया यांनीदेखील यासंदर्भातील ट्वीट केल्यानंतर या चर्चेने जोर धरला आहे. त्यातच कालच्या ‘सिल्वर ओक’वरील बैठकीत उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह फक्त सुप्रिया सुळे या हजर होत्या. अजितदादा पवार या बैठकीला नव्हते, यावरूनही शंकाकुशंका वर्तविली जात आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या उलथापालथीचे संकेत प्राप्त होत आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील हे कर्नाटकच्या निवडणुकांत व्यस्त असल्याने काँग्रेस अध्यक्षांनी तातडीने काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना महाराष्ट्रात पाठवण्याचे नियाेजन केले आहे. एआयसीसीचे राष्ट्रीय सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी उद्या मुंबईत येत आहेत. या संभाव्य भेटीचा अधिकृत तपशील हाती आला नसला तरी, राज्यातील संभाव्य घडामोडींवर चर्चा व नियाेजन होणार असल्याची माहिती आहे. मुंबई महापालिकेसह आगामी निवडणुका या उद्धव ठाकरे यांच्याच नेतृत्वात लढविल्या जाणार असून, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस त्यासाठी सकारात्मक असल्याचे ठाकरे यांना पवार यांच्यानंतर आता वेणुगोपाल हे स्पष्ट करणार आहेत, असे सूत्राचे म्हणणे आहे. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकर यांना घेण्यासंदर्भातही यावेळी चर्चा होण्याची शक्यता असून, आंबेडकरांची जागांची भूक मोठी असल्याने तीच एकमेव अडचण आहे. याबाबत आंबेडकरांशी चर्चा करण्याची जबाबदारी ठाकरे यांना घ्यावी लागणार आहे.
#WATCH | Former Maharashtra Chief Minister, Uddhav Thackeray arrives at the residence of NCP chief, Sharad Pawar, in Mumbai. pic.twitter.com/jJQujOhsiu
— ANI (@ANI) April 11, 2023
अजित पवारांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
दरम्यान, आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी सुमारे एक तास त्यांच्यात चर्चा झाली. यामुळे राजकारणात चर्चांना ऊत आला आहे. अजित पवार यांना ‘ईडी’ने राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीनचिट दिली असल्याची चर्चा हाेत असताना, ही भेट झाली आहे.
राजकीय सूत्राच्या माहितीनुसार, राज्यातील भाजपचा एक ‘वजनदार’ नेता अजित पवारांच्या पुन्हा एकदा संपर्कात असल्याची चर्चा होत असून, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सत्ता टिकविण्यासाठी हा नेता ‘प्लॅन बी’ म्हणून अजितदादांकडे पाहात आहे. त्यासाठी अजित पवारांसह आठ आमदार या ‘वजनदार’ नेत्याला पाठिंबा देण्यास तयार होतील, अशी राजकीय व्यूहरचना या ‘वजनदार’ नेत्याने आखली आहे, अशी माहितीही खात्रीशीर राजकीय सूत्राने दिली आहे. त्यामुळे मुंबईत राजकीय घडामोडींना वेग आला असला तरी, सर्वोच्च न्यायालयाचा नेमका निकाल काय लागतो? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
—————-