– निवेदनाद्वारे दिला महसूल प्रशासनाला तीव्र आंदोलनाचा इशारा
बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील अंजनी खुर्द मंडळामध्ये सप्टेंबर, ऑक्टोंबर २०२२ मध्ये अतिवृष्टी होऊन शेतकर्यांच्या शेतातील उभ्या पिकात पाणी साचल्याने पिके सडून नष्ट झाली होती. शेतकर्यांचा हातातोंडाशी आलेला घास अतिवृष्टीने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शासनाने शेतकर्यांना मदत द्यावी. या मागणीसाठी काल, १० एप्रिलरोजी अंजनी खुर्द मंडळातील शेतकर्यांनी लोणार तहसीलवर धडक देत तहसीलदारांना निवेदन दिले. तसेच, आठवडाभरात शासकीय मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
अंजनी खुर्द महसूल मंडळात सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ मध्ये अतिवृष्टी झाली होती. मात्र प्रशासनाने अंजनी खुर्द मंडळाला अतिवृष्टीपासून वगळले होते. शेजारील सुलतानपूर मंडळ अतिवृष्टीमध्ये बसविण्यात येते मग अंजनी खुर्द मंडळ अतिवृष्टीमध्ये का बसविण्यात येत नाही, या संदर्भात अंजनी खुर्द महसूल मंडळ मधील राजनी, धानोरा, शिवानी पिसा, अंजनी खुर्द, खळेगाव, महारचिकना, खापरखेड, कारेगाव, सोमठणा, ब्राह्मणचिकन, शिंदी, हिवराखंड, तांबोळा, सरस्वती व इतर गावातील शेतकर्यांनी डॉ. सुरेश हाडे यांच्यासह हनुमंत गाढवे, विनोद ताकतोडे, अंबादास खंड, कालु परसुवाले, तारामती जायभाये, रवी बोडके, अनंता शिंदे, भागवत पडघान व यांच्यासह शेकडो शेतकर्यांनी तहसील कार्यालय येथे मोर्चा काढत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. पुढील सोमवारपर्यंत कारवाई करण्यात यावी, अन्यथा शेतकर्यांच्यावतीने मंगळवारी पुन्हा तहसील कार्यालयावर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी शेतकर्यांनी दिला.
सदर आंदोलनाला लोणारचे तहसीलदार सैफान नदाफ यांनी भेट देऊन शासनाच्या नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्या शेतकर्यांना दिले, यावेळी अंजनी खुर्द मंडळातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.
——————