कर्जत (प्रतिनिधी): म.प. वि. का. सोसायटीमध्ये निर्माण झालेल्या चुरशीच्या लढतीत सत्ताधारी अंबादास पिसाळ यांच्या पॅनलने विरोधकांचा १३-० ने सुपडा साफ केल्याने तालुक्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.
कर्जत मधील म.प. वि. का. सोसायटी मध्ये १५५२ सभासद संख्या असलेल्या असून २०१२ साली अवघ्या एका जागेसाठी निवडणूक झाली होती, येवढाच अपवाद वगळता गेली २० वर्ष ही सोसायटी बिनविरोध होत होती. यावेळी मात्र भाजपात नुकतेच प्रवेश केलेले प्रवीण घुले व शिवसेना शिंदे गटाचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब नेटके व महेंद्र धांडे यांनी या संस्थेत भाजपातच असलेल्या सहकार बँकेचे संचालक अंबादास पिसाळ यांचे समोर आव्हान उभे केले. सुरुवातीला पिसाळ यांना विरोधकांना सर्व जागासाठी उमेदवारही मिळणार नाहीत असे वाटत असल्याने त्यांनी याबाबत गांभीर्य दाखवले नाही, मात्र जेव्हा या पॅनलने घुले नेटकेच्या नेतृत्वाखाली जोरदार तयारी केली तेव्हा पिसाळ यांनी आपली पारंपारिक नीती अवलंबत अत्यंत नियोजनपूर्वक मतदाराशी संपर्क साधत, विजय साकार केला. या निवडणुकीत भाजपाचेच नेते ऐकमेकापुढे उभे राहिल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली होती मात्र पिसाळ यांनी चांगल्या फरकाने आपल्या संपूर्ण पॅनलला विजयी केले.
कर्जत मधील म.प. वि. का. सोसायटी मध्ये १५५२ सभासद संख्या ११९४ मतदान झालेले होते. ३२५ च्या आसपास मयत असल्याने या निवडणुकीत जरी ७७ टक्के मतदान झाले असले तरी मयत सभासदांचा विचार करता ९५ टक्के मतदान झाल्याने निवडणुकीतील चुरस स्पष्ट होती. ४ वाजे पर्यंत जी.प. प्राथ. शाळेत मतदान झाल्यानंतर तेथेच मतमोजणी झाली व सहा वाजता निकाल जाहीर झाला. निवडणूक निर्णय अधिकारी एस डी पाटील, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी सचिन कदम यांनी काम पाहिले. तर सहा. निबंधक एस डी सुर्यवंशी यांनी उपस्थित राहून कामकाजावर लक्ष ठेवले. या निवडणुकीत पिसाळ गटाने श्री सद्गुरू गोदड महाराज सहकार पॅनलचे बाळासाहेब हरिबा ढेरे, विक्रम नवनाथ धांडे, मारुती भगवान कवडे, भाऊसाहेब सिताराम लाळगे, शांतीलाल सर्जेराव धोदाड, शांतीलाल पाडुरंग धांडे, शिवाजी तुकाराम बरबडे, रमेश आंबादास धांडे, दादा बाबुराव कांबळे, शोभा बप्पासाहेब धांडे, आदिका पांडुरंग दवणे, दत्तात्रय एकनाथ शिंदे, मधुकर विनायक खरात, आदी उमेदवारांनी बाजी मारली.
कर्जत व परिसरातील दहा बारा गावात कार्यक्षेत्र असलेल्या या संस्थेच्या अनेक वर्षानंतर होणार्या निवडणुकीत एकाच पक्षाचे नेते समोरासमोर आल्याने सर्व तालुक्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. या छोट्या संस्थेत पक्ष महत्वाचा नसला तरी विरोधक असलेले आ. रोहित पवार, आ. राम शिंदे यांनी कोणाच्या पारड्यात आपल्या समर्थकांचे मतदान घडवून आणले हे पाहणे निश्चितच महत्वाचे ठरणार आहे. पिसाळ हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खा. डॉ सुजय विखे यांचे समर्थक समजले जातात, त्यांनी आ. रोहित पवार यांना सहकार बँक निवडणुकीत दाखवलेला करिश्मा पिसाळ पॅटर्न म्हणून परिचित असल्याने या निवडणुकीला अनेक कंगोरे असून याबाबत जनतेला विश्लेषणाची अपेक्षा असून आगामी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसह आगामी जि.प. व पं.स. निवडणुकीत याचे कसे पडसाद उमटतात याकडे खरे जनतेचे लक्ष लागले असून, यावर उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. अनेक निवडणुकीत सक्रिय असणारे काही नेत्याचा प्रत्यक्ष सहभाग या निवडणुकीत नसल्याने याबाबत ही विशेष चर्चा होत आहे.