BULDHANAHead linesMaharashtraVidharbha

शेतकर्‍यांवर संकट ओढावलेले असताना राज्य सरकारचा अयोध्या दौरा; महाराष्ट्राची रोमसारखी अवस्था; शेतकरी नेते रविकांत तुपकरांचा शिंदे-फडणवीसांवर जोरदार हल्ला!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जीवंत माणसे सोडायची आणि देवाच्या दर्शनाला जायचे, यापेक्षा पुढच्या महिन्यात अयोध्येला जाता आले असते. सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. शेतकर्‍यांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा, आणि आर्थिक मदत द्या, अन्यथा पुन्हा एकदा शेतकर्‍याच्या आक्रमक आंदोलनाला सरकारला सामोरे जाव लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारला दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या अयोध्या दौर्‍यावर आहेत. त्यांचे अयोध्येत जंगी स्वागत करण्यात आले. तर इकडे महाराष्ट्रात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली. त्यामुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करून अयोध्या गाठल्याबद्दल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.
तुपकर म्हणाले, की रोम जळत असताना रोमचा राजा बिगुल वाजवत बसला होता, तशी अवस्था महाराष्ट्राची झाली आहे. वादळी वार्‍याने, गारपिटी अवकाळी पावसाने, शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आणि दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय अनेक आमदारांना घेऊन अयोध्या दौर्‍यावर गेले आहेत. हे अयोध्याचे दर्शन उशीरासुद्धा घेता आले असते. पण आज महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आधार देण्याचे काम सरकारच होते. पंचनामे करून शेतकर्‍यांना मदत करण हे सरकारच काम होते आणि अन्नदाता हा परमेश्वर आहे. अन्नदाता किंवा बळीराजाला जगवणे हे साक्षात देवाजी पूजा करण्यासारखे आहे पण जीवंत माणसे सोडायची अन देवाच्या दर्शनाला पळायचे. अयोध्याचे दर्शन पुढच्या महिन्यात घेतले असते तर चालले असते. आज महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना जीवंत ठेवणे हे सरकारचे खर्‍याअर्थाने काम होते. सरकारने पूर्णपणे शेतकर्‍याला वार्‍यावर सोडले आहे. तातडीने या शेतकर्‍यांच्या शेतीच्या पिकांचे पंचनामे करा, आणि तातडीने शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्या, अजूनपर्यंत ऑक्टोबर व सप्टेंबरची नुकसान भरपाईची मदत मिळाली नाही. ती मदत ताबडतोब द्या, आणि आठ दिवसांच्याआत शेतकर्‍यांना मदत द्या. अन्यथा पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या आक्रमक आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!