मेरा बुद्रूक, ता. चिखली (कैलास आंधळे) – शेतकर्यांकडून शेतमाल खरेदी केला. परंतु, पैसेच दिले नाहीत. या फसवणुकीच्या विरोधात अंत्री खेडेकर येथील पीडित शेतकर्यांनी अंढेरा पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु, या तक्रारीवरून संबंधित आरोपीची साधी चौकशीदेखील अंढेरा पोलिसांनी केली नाही. आज आठ ते दहा महिने झाले तरी पोलिस आरोपीला पाठीशी घालत असल्याने संतप्त शेतकर्यांनी अखेर जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड व जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे धाव घेतली असून, अंढेरा पोलिसांविषयी गंभीर स्वरुपाची तक्रार दाखल केली आहे. पोलिस आरोपीला पाठीशी का घालत आहेत, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे.
सविस्तर असे, की चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथील ज्ञानेश्वर यादवराव खेडेकर, श्रीकृष्ण डिगांबर खेडेकर व इतर शेतकरी यांनी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी बुलढाणा यांना एक निवेदन दिले आहे, की अंत्री खेडेकर येथे वाहिदखान दिलावर खान यांनी अंत्री खेडेकर येथील शेतकर्यांचा शेतमाल घेऊन पैसे दिले नाही. शेतमाल विकलेल्या शेतकर्यांनी व्यापारी वाहिद खान याला आमचे पैसे कधी देतो असे विचारले असता, वाहिद खान वेळ काढू धोरण अवलंबून शेतकर्यांना तारीख पे तारीख देत असे. अंत्री खेडेकर येथील काही शेतकर्यांना याची चाहूल लागताच त्यांनी अंढेरा पोलीस स्टेशन गाठून अंढेरा पोलीस स्टेशन येथे वाहिद खान दिलावर खान यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती.
आज रोजी आठ ते दहा महिने झाले तरी अंढेरा पोलीस स्टेशनने कोणत्याही प्रकारची चौकशी केली नाही, कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, असे शेतकर्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी दिनांक ५ एप्रिल २०२३ रोजी बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन शेतमालाच्या पैशाची फसवणूक झाल्याबाबत व ठाणेदार पोलीस स्टेशन अंढेरा येथे तक्रार देऊन कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्याबाबत तक्रार दाखल केली आहे. शेतकरी सुलतानी आणि आसमानी संकटाशी लढत असतानाच अशा शेतमालाच्या फसवणुकीमुळे शेतकरी आत्महत्येसारखे मार्ग निवडत आहे. जर शेतकर्यांच्या हक्काचे पैसे मिळत नसेल तर शेतकर्यांनी न्याय कोणाकडे मागावा? या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनासुद्धा देण्यात आल्या आहेत. निवेदनावर ज्ञानेश्वर यादवराव खेडेकर, श्रीकृष्ण डिगांबर खेडेकर व इतर शेतकर्यांच्या सह्या आहेत.