कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत येथे भगवान महावीर स्वामी जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. जैन समाजातील स्त्री-पुरुषांनी सकाळी जैन स्थानक येथून भगवान महावीरस्वामींच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. सालाबादाप्रमाणे ठरलेल्या मार्गावरून हा शांतीमार्च विविध घोषणा देत टिपर्या खेळत, गरबा खेळत पुढे सरकत होता. सकाळी मिरवणूक सुरू होतानाच जैन समाजाच्यावतीने पहिला हार घालण्याचा चढावा महावीरकुमार व सचिनकुमार बोरा परिवाराने घेतला, व भगवान महावीरांच्या प्रतिमेला पहिला हार घातला यानंतर आ. रोहित पवार यांनी हार घालत भगवान महावीरचरणी वंदन केले.
यावेळी बोलताना आमदार रोहित पवार म्हणाले, की भगवान महावीरांनी जिओ और जिने दोचा जो संदेश दिला तो अत्यंत महत्वाचा असून, आपण स्वत: जगत असताना किडा-मुंगीसह सर्व सृष्टीला जगण्याचा अधिकार आहे, हा संदेश अशांत जगाला शांतीचा मार्ग दाखवणारा आहे. जैन समाजात तपाला ही विशेष महत्व असते, असेही त्यांनी सांगून महावीरांच्या शिकवणुकीला उजाळा दिला. यावेळी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शहरात मिरवणुकीदरम्यान नगराध्यक्षा सौ. उषा राऊत, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, भाजपनेते प्रवीण घुले, नगरसेवक नामदेव राऊत, नगरसेवक रज्जाक झारेकरी, मुंजोबा तरुण मंडळ कार्यकर्ते रवींद्र सुपेकर, काँग्रेसचे सचिन घुले व ओंकार तोटे, अर्बन बँकेच्या संचालिका मनिषा कोठारी, रासपचे रवींद्र कोठारी, नगरसेवक अभय बोरा, व्यापारी असो.चे अध्यक्ष बिभीषण खोसे आदीसह विविध ठिकाणी अनेकांनी पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. या सर्वांना भारतीय जैन संघटनेच्या वतीने धन्यवाद देण्यात आले. बाजारतळ येथील जैन स्तंभाला जैन समाजाच्यावतीने पुष्पहार घालण्यात आला. यानंतर आराधना भवन या ठिकाणी या शंतीमार्चचा समारोप झाला. मिरवणुकीत पोलीस उपनिरीक्षक भगवान शिरसाठ यांचे सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
कर्जत येथील श्री कलिंकुंड पार्श्वनाथ मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. आराधना भवन या ठिकाणी जन्मवाचन झाले. यावेळी वर्षभरात विविध तपस्या करणार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी महिलांनी मुलींनी सुंदर गाणे सादर केले. भारतीय जैन संघटनेचे विभागीय सदस्य प्रसाद शहा यांनी जन्मवाचन केले. सर्व जैन बांधवासाठी जैन स्थानक येथे गौतम प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. भारतीय जैन संघटनेचे अध्यक्ष विजय खाटेर व उपाध्यक्ष राकेश देसाई यांचेसह अनेकांनी विशेष मेहनत घेत हा सोहळा पार पाडला. सायंकाळी सहा वाजता पशूपक्षी व मोकाट जनावरे यांना पाणी पिण्यासाठी विविध ठिकाणी कुंड्या उभ्या करून त्याचे पूजन करत शुभारंभ करण्यात आला, तर या नंतर युवकांनी बाईक रॅली काढून पंचरंगी ध्वज शहरातून फिरवत महावीरांचा संदेश दिला.
भगवान महावीर स्वामी जन्मोत्सव मिरवणुकीमध्ये अनेक ठिकाणी कुल्फी, आईस्क्रीम, पाण्याच्या बाटल्या वाटण्यात आल्या, याचा पडलेला कचरा लगेच जैन बांधवांनी उचलून स्वच्छ कर्जतला हातभार लावला. असेच अनुकरण सर्वच नागरिकांनी केले तर कर्जत कायमस्वरूपी स्वच्छ राहण्यास नक्कीच मदत होईल.
—————-