भारजवाडी येथे श्रीक्षेत्र भगवानगडाच्या नारळी सप्ताहास उत्साहात प्रारंभ
– भाविकांना दिला पुरणपोळीचा प्रसाद
शेवगाव, जि.नगर (बाळासाहेब खेडकर) – श्रीक्षेत्र भगवान गडाचा ८९ वा फिरता नारळी सप्ताह भगवानगडाच्या पायथ्याशी असणार्या मौजे भारजवाडी येथे मोठ्या उत्सहात भाविक भक्तांच्या उपस्थितीत सुरू झाला आहे. यावेळी मोठ्या संख्येने भाविक-भक्त उपस्थित होते. भगवानगडाचे संत भगवानबाबांनी सुरू केलेला ८९ वा फिरता नारळी सप्ताह यावर्षी पाथर्डी तालुक्यातील मौजे भारजवाडी येथे होत असल्याने गुढी पाडव्यापासून प्रत्येक घरावर गुढी उभारली गेली आहे, ती गुढी सप्ताहाच्या सांगता समारंभापर्यंत राहणार आहे. आज, मंगळवार भारजवाडी ग्रामस्थांनी भगवानगडावर जाऊन गडाचे महंत डॉ. नामदेव शास्त्री यांची भगवानगड ते भारजवाडी सवाद्य भव्य मिरवणूक व महिलांनी डोईवर कलश घेवून टाळ मृदुंगाच्या गजरात भव्यदिव्य शोभायात्रा काढत सप्ताहस्थळी आगमन झाले.
भगवानगडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी यांच्याहस्ते भगवानबाबांच्या प्रतिमेचे पूजन व टाळ-वीणा, मुदंग यांचे पूजन झाले. त्यानतंर श्रीक्षेत्र भगवान गडाचे महंत डॉ.नामदेव शास्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पवृष्टीने ८९ व्या नारळी सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. शिरूर कासार येथील सिध्देश्वर संस्थानचे महंत विवेकानंद स्वामी यांच्याहस्ते गाथा पूजन संपन्न झाले. व सप्ताहास प्रारंभ झाला. पुष्पवृष्टी प्रसंगी भगवान गडाचे प्रधान आचार्य नारायण स्वामी, सिध्देश्वर संस्थानचे मठाधीपती विवेकांनद शास्त्री, येळेश्वर संस्थानचे मठाधीपती रामगिरी महाराज, भालगाव संस्थानचे नवनाथ महाराज गाडे, मिडसांगवी येथील सालसिद्धेश्वर संस्थानचे मठाधीपती हनुमान सातपुते, तागडगाव येथील भगवानबाबा संस्थानचे मठाधीपती अतुल शास्त्री, हरिश्चंद्र संस्थानचे भगवान महाराञ राजपूत, एकनाथवाडी येथील निरंजण संस्थानचे मठाधीपती कृष्णा महाराज व ज्ञानेश्वरी विद्यापीठामधील आजी माजी विद्यार्थी व मान्यवर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रताप ढाकणे, माजी जिल्हा परिषद सदस्या प्रभावती ढाकणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशकंर राजळे, बीड जिल्ह्यातील सुशिला मोराले, प्रा . दादासाहेब मुंढे उपस्थित होते.
————-