सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सरकारने शेतकर्यांना ३५० रुपये कांदा अनुदान जाहीर केले आहे. परंतु सातबारा उतार्यावरील नोंदीची अट घातली आहे. तरी ही अट रद्द करावी व शेतकर्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा करावा, यासह अनेक प्रश्न उपस्थित करीत नागरिकांनी प्रशासनाला धारेवर धरले.
दक्षिण सोलापूर तालुक्याची आमसभा सोमवारी सकाळी रंगभवन येथे झाली. या आम सभेत नागरिकानी तालुक्यातील ज्वलंत प्रश्न उपस्थित केले. या प्रश्नामध्ये प्रामुख्याने शेतीसाठी वीज आठ तासांची करण्यात आली आहे. परंतु त्या आठ तासात दुरूस्तीचे काम काढले जाते त्यामुळे शेतकर्यांना प्रत्यक्ष चार तासच वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे शेतकर्यांना सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी सुधीर लांडे यांच्यासह तालुक्यातील शेतकर्यांनी केली. याबरोबरच संजय गांधी निराधार योजनेसाठी शासनाने २१ हजार रूपये उत्पन्नाची अट रद्द करावी, कारण सध्या सर्वाचे उत्पन्न वाढले आहे. याबाबत शासनाला कळविण्याचे आश्वासन तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिले. शेवटी तालुक्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी सर्व प्रश्न मार्गी लावू. त्यासाठी नागरिकांनी ही सहकार्य करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दक्षिण सोलापूर तालुक्याचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी केले. यावेळी सहायक जिल्हाधिकारी मनिषा आव्हाळे, तहसीलदार अमोल कुंभार, महिला बालविकास अधिकारी समाधान नागणे, सोलापूर दक्षिणचे उपविभागीय अधिकारी सुनील कटकधोंड, माजी पंचायत समिती सदस्य धनेश आचलारे, रामाप्पा चिवडशेट्टी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अण्णाराव बाराचारे, सहाय्यक प्रशासनाधिकारी विवेक लिंगराज यांच्यासह तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे मांडले प्रश्न –
– तालुक्यातील अवैध धंदे बंद करावे
– पी. एम. किसान योजनेचा लाभ शेतकर्यांना मिळत नाही, युरिया मिळत नाही
– महामार्गामध्ये जमीन गेलेल्या शेतकर्यांना मोबदला मिळत नाही
– वाड्या वस्तयावर सिंगल फेजची सोय करावी, मंद्रूपमध्ये कायमस्वरूपी थ्री फेज करावी
– मंद्रूप मध्ये एमआयडीसीचा ठराव मंजूर
– संजवाड ग्रामपंचायतीसाठी स्वतंत्र ग्रामसेवक द्यावा
– रेशन कार्ड दुबार, दुरुस्ती, नवीन साठी स्वतंत्र यंत्रणा लावावी
– महार वतन जमीन शासनाच्या नावाने असून ती कसणार्याच्या नावाने करावी
– कुंभारी गाव नगर परिषदेमध्ये घालू नये, बोरामणी विमानतळ त्वरित सुरू करावे
– माजी मंत्री आनंदराव देवकते यांचा पुतळा उभारावा
– जल जीवन योजनेचे काम घेतलेले ठेकेदार फोन उचलत नाहीत
– शेतकर्यांना कृषीच्या योजनांची माहिती द्यावी
——————