कर्जतमध्ये अनोखा हिंदू-मुस्लीम भाईचारा; रमजानचा ‘रोजा’ व एकादशीचा ‘उपवास’ सोडला एकाच पंगतीत!
कर्जत (आशीष बोरा) – संत श्री गोदड महाराज हे अत्यंत जागृत देवस्थान आहे, येथे न्याय हा प्रत्येकाला मिळतो, नगर पंचायत निवडणुकीत महाराजांच्या दारात बिनधास्त एक रात्र झोपलो व सहा महिन्यात न्याय मिळाला. नुसता आमदारच झालो नाही तर महाराजांनी सरकार पण आणले, असे म्हणत निधी आणणे हे माझे कर्तव्यच असल्याचे सांगत, एकादशीचा फराळ व रोजाचा उपवास एकाच ठिकाणी सोडणारे फक्त कर्जतच्या भूमीतच असल्याचे मत आ. प्रा राम शिंदे यांनी व्यक्त केले. कर्जत येथील ग्राम दैवत संत श्री गोदड महाराज जन्मस्थळ परिसर विकासासाठी शासनाने साडेतीन कोटी रुपये आ. प्रा. राम शिंदेच्या पाठपुराव्यामुळे मंजूर केले, त्याबद्दल ट्रस्टच्यावतीने आ. शिंदेचा सत्कार करण्यात आला. यावेळी श्री गोदड महाराज जन्म स्थळ मंदिर ट्रस्टचे विश्वस्त महेश तनपुरे यांनी स्वागत केले. यावेळी मुस्लिम समाजाच्या वतीनेही आ. प्रा. राम शिंदेचा सत्कार करण्यात आला.
माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले यांनी बोलताना कर्जतचे ग्राम दैवत संत श्री गोदड महाराज जन्मस्थळ परिसर विकासासाठी एक रुपयाची मागणी केलेली नसताना आ. शिंदे यांनी साडे तीन कोटी रुपये निधी मंजूर करून आपले मोठे पण दाखवून दिले असून, आज याठिकाणी एकादशीचा उपवास करणारे व रमजानचा उपवास करणारे एकत्र भोजन करण्यासाठी आलेले आहेत, हे कर्जत मधील जातीय सलोख्याचे उत्तम उदाहरण आहे, असे म्हटले. आ. प्रा. राम शिंदे यांनी बोलताना महाराजांचा रथ मार्ग चांगला करायचा राहिला आहे का, मुद्दाम ठेवला आहे? हा प्रश्न उपस्थित करत, मुद्दाम मागे ठेवलेला रथ मार्ग पूर्ण करण्यासाठीच महाराजांनी मला पुन्हा न्याय दिला व आमदार केले आहे. महाराजांच्या दरबारात न्याय मिळतो हा आपल्याला विश्वास आहे, आपणही रा विकास करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करू मुस्लिम समाजाचे राहिलेले प्रश्न सोडवू असे म्हटले.
यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे, तालुका अध्यक्ष, डॉ सुनील गावडे, विनोद दळवी, तानाजी पाटील, शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर, काकासाहेब धांडे, अनिल गदादे, प्रदीप पाटील, बिभीषण खोसे, काका ढेरे, गजानन फलके, ईल्लूभाई पठाण, कासम पठाण, राजू बागवान, माजीद पठाण, दादासाहेब रोकडे, आयुब काझी, अब्बास पठाण, मिणाज सय्यद, शरीफ पठाण, राहुल कानडे, काकासाहेब मांडगे, विनायक खराडे, आदी सह अनेक जण उपस्थित होते. शेवटी श्री गोदड महाराज जन्म स्थळ मंदिर ट्रस्टचे सचिव तानाजी पाटील यांनी आभार मानले.
कर्जत येथे श्री गोदड महाराज जन्म स्थळ मंदिर ट्रस्ट व प्रवीण घुले मित्र मंडळ यांचे वतीने आ. प्रा. राम शिंदेच्या सत्कारबरोबरच रमजान सणानिमित्त मुस्लिम बांधवां सह भगिनीसाठी ईफ्टार पार्टीचे व पैठण वारीत पायी जाणाऱ्या वारकरी स्त्री पुरुष भाविकांसाठी फराळाचे आयोजन करण्यात आले. रमजानचा रोजा सोडणारे व एकादशीचा फराळ करणारे एकाच पंगतीत बसून आप आपले उपास सोडत असल्याचे आगळे वेगळे सामाजिक एकतेचे चित्र पाहावयास मिळत होते.