स्वभाव नडला; माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे यांचा पदभार काढला!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाची धुरा काही दिवसांपूर्वीच सुलभा वठारे यांच्याकडे देण्यात आली होती. परंतु शिक्षकांचा गोंधळ आणि त्यांचा स्वभाव पाहता त्यांच्याकडील असलेला पदभार तडकाफडकी काढून घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सोमवारी घेतला.
सध्या माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार महिला बाल कल्याण अधिकारी जावेद शेख यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसापासून माध्यमिक शिक्षण विभागामध्ये गोंधळ सुरू होता. शासनाने २० टक्के, ४० टक्के, ६० टक्के अनुदानाचा टप्पा जाहीर केला आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्था तसेच शिक्षकांना अनुदानाचा टप्पा जाहीर केल्याने सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मोठी गर्दी दिसून येत होती. विशेषतः हे अनुदान आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी शिक्षक गेल्या काही दिवसापासून झेडपीमध्ये कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी रात्रंदिवस ठाण मांडून बसले होते. परंतु जिल्ह्यातील अडीचशे ते तीनशे शिक्षकांचे अप्रोलच खोटे असून, त्याचे शिक्षण विभागात आवक जावकची नोदच नसल्याची खळबळ जनक माहिती शिक्षणाधिकारी यांनी सांगताच शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती. शिक्षकाचे असे म्हणणे होते की गेल्या अनेक वर्षापासून आमच्या जर पगारी होत असेल तर आमचा अप्रोल कसा खोटा?
माध्यमिक शिक्षणाधिकारी वठारे यांचे असे म्हणणे होते की, घरी बसून अप्रोल दिला असेल तर मी अशा आप्रोलला मान्यता कशी देऊ? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे या सर्व गोंधळाच्या प्रक्रियेमध्ये सीईओ यांच्याकडेदेखील शिक्षकांनी तक्रारी केल्या होत्या. शिवाय, माध्यमिक शिक्षण विभागातील काही कर्मचार्यांनीदेखील तक्रार केली असल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांचा पदभार काढला की काय अशी जनमानसात चर्चा होत आहे.
माध्यमिक शिक्षण विभागाचा पदभार देण्याबाबत माझ्याशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी चर्चा केली आहे. तरी अद्याप याबाबतचे पत्र देण्यात आले नाही. त्यामुळे पत्र दिल्यानंतर मी पदभार स्वीकारेन.
– जावेद शेख, प्रभारी शिक्षणाधिकारी