कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत शहरास किमान पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने कर्जत नगर पंचायतला निवेदन देऊन करण्यात आली आहे. या गंभीर व दुर्लक्षित प्रश्नाकडे राष्ट्रीय समाज पक्षाने लक्ष वेधले असले तरी खरोखर सर्व सामान्याची अडचण प्रशासन व लोक प्रतिनिधी समजून घेतील का, असा प्रश्न शहराध्यक्ष अमोल क्षीरसागर यांनी विचारला आहे.
कर्जत शहरात नगर पंचायतच्या नळ योजनेतून मिळणारे पाणी पिण्यासाठी वापरले जात नाही, यामुळे प्रत्येक कुटुंबाला पिण्याच्या पाण्यासाठी पैसा आजही खर्च करावा लागत असून, या गंभीर प्रश्नाकडे राष्ट्रीय समाज पक्षाने नगर पंचायतला निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, कर्जत शहरामध्ये नवीन पाणीपुरवठा योजना अंतर्गत निधी आला होता, त्यावेळी ही योजना आपल्या कर्जत शहरात राबवण्यात आली आणि जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यात आला. या योजने अंतर्गत कर्जत- शहराला पिण्याचे पाणी मिळणे अपेक्षित होते. सर्व सुविधा उपलब्ध असून देखील अद्याप एकदाही पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा शहराला झाला नाही, तेव्हा शासनाची एवढी मोठी योजना आणि निधी गेला कुठे, असा प्रश्न उभा राहतो. आज कित्त्येक ग्रामपंचायत/नगरपंचायत/नगरपालिकामध्ये पिण्याचे पाणी पुरवले जाते, तशी पाणीपट्टी देखील जमा केली जाते. मग कर्जत शहरात कोट्यावधीचा निधी येऊन देखील व जलशुद्धीकरण प्रकल्प असून देखील सर्वसामान्य माणसाला पिण्यासाठी विकत पाणी घ्यावे लागत आहे असे का? ही खेदाची बाब नाही का? असा प्रश्न उपस्थित करत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने विनंती की, कर्जत शहरास नगरपंचायत मार्फत पिण्याचे पाण्याचा पुरवठा करणेबाबत लवकरात लवकर कारवाई करावी, अन्यथा येणार्या काळामध्ये नगर पंचायत प्रशासनाच्या विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मोठे जनआंदोलन उभा केले जाईल, असा इशाराही निवेदनात दिला आहे.
निवेदनावर राष्ट्रीय सचिव रविंद्र कोठारी, जिल्हा संपर्क प्रमुख रमेश व्हरकटे, युवक तालुका अध्यक्ष महेंद्र कोपनर, शहराध्यक्ष अमोल बाळासाहेब क्षीरसागर, रविंद्र पवार, मंगेश जायभाय, केतन रमेश राऊत आदीच्या सह्या आहेत. कार्यालयात मुख्याधिकारी वा कार्यालयीन अधीक्षक उपस्थित नसल्याने कार्यालयातील कर्मचारी रुपाली भालेराव यांनी हे निवेदन स्वीकारले. कर्जत नगर पंचायत मध्ये सत्ताधारी पक्षाने पाणी प्रश्नाचे भांडवल करत निवडणूक लढवली मात्र या मुख्य व गरजेच्या प्रश्नाकडे नंतर पूर्णत: दुर्लक्ष केले असून न.पं. मधील विरोधक ही सत्ताधारी पक्षात सामील झाले आहेत असा आरोप करताना, आ. प्रा. राम शिंदे यांनी कोट्यावधी रुपयांची पाणी योजना कर्जत साठी मंजूर करून दिली हा प्रकल्प उभारला गेला मात्र यातून शुद्ध पाणी शहराला मिळते की नाही हे भाजपाच्या पदाधिकारी यांना माहीत नाहीत का व तरीही भाजपाचे स्थानिक पदाधिकारी या विषयात आवाज का उठवत नाहीत असा प्रश्नही अमोल क्षीरसागर यांनी उपस्थित करून एक प्रकारे भाजपाला ही चॅलेंज केले आहे.
कर्जत शहराला शुध्द पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुध्दीकरण प्रकल्प २०१८ मध्ये सुरू करण्यात आला. यासाठी शासनाने २८ कोटी १९ लाख रुपये मंजूर केले होते, त्यात हा प्रकल्प ही उभा राहिला असताना कर्जत शहराला खरोखर पिण्यायोग्य पाणी नळाद्वारे मिळते का हा संशोधनाचा विषय असून, सोशल मीडियामध्ये मोठ मोठ्या गप्पा मारणारे जनतेच्या प्रश्नावर का लक्ष देत नाहीत हा खरा प्रश्न आहे.