सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून सरकारी, निमसरकारी कर्मचारी संपावर आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी सरकारी कर्मचार्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जागरण गोंधळ घालत पेन्शन देण्याची मागणी शासनाकडे केली. सलग तिसर्या दिवशीही कर्मचार्यांचा संप सुरूच असल्यामुळे जिल्हा परिषद, महानगरपालिका, सिव्हील हॉस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय येथील संपूर्ण कर्मचारी संपामध्ये गेल्यामुळे कामकाज पूर्ण ठप्प झाले आहे. त्यामुळे शासकीय कार्यालय जिल्हा परिषद या ठिकाणी केवळ विभाग प्रमुख वगळता उर्वरित सर्व कर्मचारी संपावर गेल्यामुळे कार्यालयामध्ये शुकशुकाट होता.
दरम्यान, जिल्हा परिषदेचा काही निधी मार्च अखेरपर्यंत खर्च करणे अपेक्षित आहे. परंतु कर्मचार्यांच्या संपामुळे मार्च अखेरपर्यंत हा निधी खर्च होईल की नाही याची चिंता सध्या आता झेडपीच्या अधिकार्यांना लागली आहे. विशेष म्हणजे, हा निधी सन २०२२ – २३ वर्षातील असल्यामुळे तो निधी मार्च अखेर पर्यंत खर्च होणे अपेक्षित आहे. परंतु सध्या कर्मचार्यांचा संप असल्यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये अनेक ठेकेदार, वैयक्तिक लाभाच्या योजनेचे लाभार्थी हेलपाटा मारत आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचार्यांनी थाळी वाजून शासनाचा निषेध केला.
यावेळी कर्मचारी संघटनेचे अरूण क्षीरसागर, गिरीष जाधव, विवेक लिंगराज, नागेश पाटील, अविनाश गोडसे, संतोष जाधव, दिनेश बनसोडे, भिमाशंकर कोळी,लक्ष्मण वंजारी, श्रीकांत मेहरकर, योगेश हब्बू, विशाल घोगरे, अनिल जगताप, पाणी व स्वच्छता कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सचिन जाधव, मोहित वाघमारे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, मुकूंद आकुडे, महादेव शिंदे, गणेश हुच्चे, अनिल पाटील, आप्पाराव गायकवाड, संतोष शिंदे, सचिन घोडके, सचिन पवार, रफीक मुल्ला, सिद्धाराम बोरूटे, रणजीत घोडके आदी उपस्थित होते.
बांधकाम एकचे ९६ कर्मचारी संपावर आहेत. तर जवळपास आठ कर्मचारी रजेवर गेले आहेत. प्रत्यक्ष कामावर जवळपास ९१ कर्मचारी हजर आहेत. त्यामुळे मार्चअखेर पर्यंत निधी खर्च करण्याचे आमचे नियोजन सुरू आहे.
– नरेंद्र खराडे, कार्यकारी अभियंता, बांधकाम एक
—————————–