Pachhim MaharashtraSOLAPUR

विद्यापीठाच्या २७८ कोटी १६ लाख ९६ हजारांच्या अंदाजपत्रकास अधिसभेची मंजुरी

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाच्या अंदाजपत्रकात २४० कोटी ४० लाख ७५ हजार ५०० रुपये इतकी अपेक्षित रक्कम जमा धरून २७८ कोटी १६ लाख ९६ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास अधिसभेने एकमताने दुरुस्तीसह मंजुरी दिली. या अंदाजपत्रकात ३७ कोटी ७६ लाख २० हजार ५०० रुपये इतकी तूट दर्शविण्यात आली आहे. विद्यार्थी विकास आणि संशोधनासाठी या अंदाजपत्रकात भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे.

मंगळवारी, विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक पार पडली. या बैठकीत विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी सी.ए. श्रेणीक शाह यांनी अंदाजपत्रक सादर केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्यासह अधिसभेचे सदस्य उपस्थित होते. या सभेचे सचिव म्हणून प्रभारी कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी काम पाहिले. विद्यापीठाच्या या अंदाजपत्रकाची प्रामुख्याने पाच टप्प्यांमध्ये वर्गवारी करण्यात आली आहे. देखभाल, वेतन, ऋण आणि अनामत, योजना अंतर्गत विकास -भाग एक तसेच योजना अंतर्गत विकास- भाग दोन अशा पाच टप्प्यांमध्ये अंदाजपत्रक सादर करण्यात आले. यंदाच्या अंदाजपत्रकात विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तसेच संशोधन कार्यासाठी विविध उपक्रम राबवून त्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. अंदाजपत्रक सादर झाल्यानंतर व्यवस्थापन परिषदेच्या सदस्या मोहिते-पाटील यांनी हा अंदाजपत्रक सर्वंकष असून यामुळे विद्यापीठाच्या विकासाला निश्चित चालना मिळेल, असे सांगून अनुमोदन दिले. अधिसभेच्या बैठकीत सुरुवातीला कुलगुरु डॉ. फडणवीस यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर केला. त्यानंतर प्रश्नोत्तराचा तास पार पडला. अंदाजपत्रकाच्या सादरीकरणानंतर सदस्यांनी काही ठराव मांडले. ठरावावर चर्चा करुन निर्णय घेण्यात आले. विद्यापीठ गीताने सभेची सुरुवात झाली तर ‘वंदे मातरम’ने सभेची सांगता झाली.


– अंदाजपत्रकातील ठळक मुद्दे –

– संशोधन कार्याला चालना मिळण्यासाठी व उद्योजक पिढी निर्माण करण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या इनक्युबेशन सेंटरसाठी एक कोटी रुपयांची तरतूद.
– सीड मनी संशोधन उपक्रमाकरिता ३० लाख रुपयांची भरीव तरतूद
– कमवा व शिका योजनेसाठी १२ लाख ५० हजार रुपयांची तरतूद
– विद्यापीठातील शिक्षक व कर्मचार्‍यांसाठी वैद्यकीय प्रतिपूर्ती योजनेसाठी १५ लाख रुपयांची तरतूद
– मराठी भाषा गौरव दिनाकरिता ८ लाख रुपयांची तरतूद
– विद्यापीठातील शिक्षक व कर्मचार्‍यांसाना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कार्यशाळा व परिसंवादासाठी १० लाख रुपयांची तरतूद
– परदेशी विद्यापीठाबरोबर संशोधन कार्यासाठी ९ लाख रुपयांची तरतूद
– विद्यार्थ्यांच्या संशोधन शिष्यवृत्ती योजना आणि विद्यापीठ परिसरातील गरीब ४० विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके भेट उपक्रमासाठी भरीव तरतूद
– विद्यापीठ आयएसओ मानांकनासाठी ५ लाख रुपयांची तरतूद
– महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्था पुणे यांच्याकडून प्राप्त निधीतून विविध उपक्रम व कार्यक्रमासाठी २५ लाख रुपयांची तरतूद
– वृक्ष संवर्धनासाठी शासन मार्गदर्शनानुसार १.२० कोटी रुपयांची तरतूद
– विद्यापीठ परिसरात स्वच्छता सुविधांसाठी ५ लाख रुपयांची तरतूद
– ग्रंथालय विकास निधीकरिता २ लाख रुपयांची तरतूद
– शास्त्रीय उपकरण केंद्रासाठी ३ कोटी रुपयांची तरतूद
– विद्यार्थी विकास यासाठी नाविन्यपूर्ण योजना व तरतुदी
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!