BULDHANAHead linesVidharbha

शेतकरी, विद्यार्थी, योजनांच्या लाभार्थ्यांना संपाचा फटका!

– जिल्ह्यातील सर्वात मोठा संप; शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प!

बुलढाणा (गणेश निकम) – जुनी पेन्शन लागू करण्यात यावी, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी शासकीय, निम शासकीय कर्मचार्‍यांनी संपाचे हत्यार उगारले आहे. आजपासून कर्मचारी संपावर गेल्याने शासकीय कार्यालयांचे कामकाज ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास तीस हजार कर्मचारी संपात सहभागी झाल्याचे समजते. दरम्यान, आज कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे निदर्शने करून जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करणारे निवेदन प्रशासनास दिले.

शासन व कर्मचार्‍यांच्या या पेटलेल्या संघर्षात हजारो सर्वसामान्य नागरिक भरडले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने लाखो शेतकरी, विद्यार्थी, विविध योजनांचे लाभार्थी, नागरिक यांचा समावेश आहे. संपाच्या पहिल्याच दिवशी शेकडो कार्यालयातील कामकाज प्रभावित झाले असून, सर्वसामान्य नागरिकांना याची झळ लागत असल्याचे गंभीर चित्र आहे. कर्मचारी नेते तेजराव सावळे व जिल्हा समन्वय समितीचे निमंत्रक किशोर हटकर यांनी सांगितले की, आजच्या संपात तीस हजारांवर शासकीय, निम शासकीय कर्मचारी सहभागी झाले आहे. यामध्ये महसूल, कृषी, आरोग्य विभाग, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, नगरपालिका, नगरपंचायत, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, कारागृह कर्मचारी, ग्रामसेवक , आश्रमशाळा आदी विभागाच्या कर्मचार्‍यांचा समावेश आहे.


कर्मचार्‍यांची निदर्शने

आज, १४ मार्चच्या सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कर्मचार्‍यांनी निदर्शने केली. विविध आक्रमक घोषणांनी परिसर दणाणला! तेजराव सावळे, किशोर हटकर, पंजाबराव गायकवाड, राहुल हिवाळे, अपर्णा आघाव, नंदकिशोर येसकर, प्रशांत रिंढे, अमोल टेम्भे, विलास मानवतकर आदींच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले आहे.
——————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!