सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांना जुनी पेन्शन लागू करा, या मागणीसाठी सोलापुरात कर्मचार्यांनी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपामुळे सोलापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय कामकाज ठप्प झाले होते. तर भरउन्हात कर्मचारी रस्त्यावर ठिय्या मांडल्याने शासकीय कार्यालयात ओस पडले असल्याचे दिसत होते.
जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी सोलापुरातील अनेक शासकीय, निमशासकीय विभागातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे शासकीय कार्यालयामध्ये शुकशुकाट दिसून येत होता. अनेक नागरिक ग्रामीण भागातून शासकीय कार्यालयात आले असता कर्मचार्यांच्या संपामुळे अनेक कामे खोळंबल्यामुळे नागरिकांना हेलपाटा मारावे लागले. दरम्यान, या संपामध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिका, सिव्हील हॉस्पिटल, महसूल, आरोग्य, शिक्षण सर्व विभागातील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे संपूर्ण कामकाज खोळंबले होते.
शासनाने २००५ पासून जुनी पेन्शन योजना बंद केली. त्यामुळे शासकीय, निमशासकीय कर्मचार्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. जुनी पेन्शन योजना बंद केल्याने पुढची पिढी जगायची कशी असा प्रश्न या कर्मचार्यांना पडला आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकीमध्ये जे सरकार कर्मचार्यांना पेन्शन लागू करेल त्या सरकारला मतदान करायचे असा निर्धार या प्रसंगी कर्मचार्यांनी केला. यापूर्वी सध्याची विरोधी गटांमध्ये हे सरकार होते त्याने देखील जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन दिले परंतु ते न केल्यामुळे त्यांना आज सत्तेपासून दूर बसावे लागले आहे.
अनेक वेळा सरकारकडून जुनी पेन्शन योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर अधिकचा भार पडत असल्याचा खोटा अपप्रचार करण्यात आला. परंतु पेन्शन द्यायचं असेल तर कुठूनही देता येऊ शकते. त्यासाठी सरकारची नियत चांगली असावी लागते. एकीकडे खासदार, आमदारांना महिन्याला पन्नास हजार रुपये पेन्शन सुरू केली आहे. परंतु सरकारी कर्मचारी आयुष्यभर काम करून देखील त्याला जर पेन्शन मिळत नसेल तर तो कर्मचारी सेवानिवृत्तीनंतर जगणार कसा? असा प्रश्न याप्रसंगी उपस्थित केला.
या संपामध्ये माजी आमदार आडम मास्तर, माजी आमदार दिलीप माने यांचे चिरंजीव पृथ्वीराज माने, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, गिरीश जाधव, अरुण क्षीरसागर, अनिल जगताप, संतोष जाधव दिनेश बनसोडे, संजय जांभळे, सचिन पवार, महेश केंद्रे, गुरु रेगे, विशाल घोगरे, नरेंद्र अकेले, गणेश हुच्चे, अनिल पाटील, ज्ञानेश्वर सुमधुरले, आप्पा भोसले, मंजिरी घोडके, वैशाली शिंदे, अनिता तुपारे, ज्योती काटकर, सुजाता कांबळे, वैशाली रामपुरे, छाया क्षीरसागर यांच्यासह सर्व विभागाचे संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.