KARAJATPachhim Maharashtra

बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाला वाचविण्यात अपयश; कोपर्डीतील दुर्देवी घटनेने राज्य हळहळले!

– दुःखद प्रसंगातही नेत्यांच्या कार्यकर्त्यांची श्रेयवादाची लढाई; लोकांत संतप्त भावना!

कर्जत (प्रतिनिधि) – कोपर्डी येथे बोअरवेलमध्ये पडलेल्या बालकाला दहा तासाच्या अविरत निकराच्या प्रयत्नांती बाहेर काढण्यात आले. पण, त्याला वाचविण्यात अपयश आले. या दुर्देवी घटनेने दु:खाचे सावट पसरले असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असताना सोशल मीडियावर मात्र नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून श्रेयवादाचे युद्ध पेटले होते. आमच्याच नेत्याने कसा मदतीचा हात दिला हे पटवून देण्यात व विरोधकांना पाण्यात पाहण्याचे जोरदार काम सुरू असताना दुःखद प्रसंगातही राजकीय कुरघोड्याचा वीट आला असल्याच्या प्रतिक्रिया जनतेत व्यक्त केल्या जात आहेत.

सोमवारी संध्याकाळी पाच वाजता कोपर्डी (ता. कर्जत) येथील काकासाहेब ज्ञानदेव सुद्रिक यांच्या शेतातील बोअरवेलमध्ये ऊसतोड कामगारांचा पाच वर्षांचा मुलगा सागर बुधा बरेला (रा. चिडीयापुरा, ता. बर्‍हाणपूर मध्यप्रदेश) हा खेळता खेळता पडला. याबाबत काही वेळाने ग्रामस्थांना माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थ धावत आले व त्यांनी मदतीला सुरुवात केली. याबाबत प्रशासनाला माहिती कळविण्यात आली यानंतर प्रांताधिकारी गोविंद तळपदे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, प्र. सहा. पोलीस निरीक्षक सतीश गावित, ग्रामसेवक मनोज घालमे आदीसह अनेकांनी शर्थीचे प्रयत्न करून या बचाव मोहिमेवर लक्ष ठेवत तातडीने काम कसे होईल हे पाहिले. तो बोअरच्या १५ फूट खोलीवर असल्याचे जाणवत असल्याने त्याला वाचविण्यासाठी समांतर दोन जेसीबी पोकलेनच्या साह्याने खोदकाम सुरू करण्यात आले. त्यास ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्राणवायूची नलिका बोअरमध्ये सोडण्यात आली, त्याला वाचविण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू होते. सायंकाळी दहा वाजता एनडीआरएफ चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या बचावकार्य कसोशीने पुढे नेले. १०८ रुग्णवाहिका तसेच अग्निशमन गाड्या घटनास्थळी उपलब्ध करून देण्यात आल्या.

दरम्यान, आ. रोहित पवार व आ. राम शिंदे यांना घटना कळल्यानंतर त्यांनीही याबाबत माहिती घेत संबंधितांना सूचना दिल्या. दहा फुटानंतर कठीण खडक लागल्याने काहीकाळ अडचणी आल्या. मात्र त्यावर तातडीने उपाययोजना करत काम पुढे चालू करण्यात आले. रात्री उशिरा बोअरवेलमध्ये अडकलेल्या सागरपर्यत पोहचण्यात बचाव कार्यातील टीमला यश आले, पण पण हे यश मात्र अपयशी ठरले. सागरला पांढर्‍या कापडात गुंडाळत रुग्णवाहिकेत नेण्यात आले, मात्र तेथे त्याला मयत घोषित करण्यात आले व सुटकेचा श्वास सोडलेली मने दुःखाने भरून गेली. आई-वडिलांनी जो हंबरडा फोडला त्याने उपस्थितांची मने हेलावून गेली. सलग दहा तास सुरू असलेले मदतकार्य अपयशी ठरल्याने सर्वानाच खूप दुःख होत होते. कोपर्डीत बोअरवेलमध्ये बालक पडल्याची बातमी तालुक्यात वार्‍यासारखी पसरल्यानंतर अनेकांनी हा बालक सुखरूप रहावा यासाठी ईश्वराकडे प्रार्थना केल्या. अनेकांनी कोपरडीकडे धाव घेत विनाकारण गर्दीही केल्याचे पहावयास मिळत होते.


या दुःखद घटनेनंतर ही राजकीय कार्यकर्त्यानी आपल्या नेत्याने कशी मदत केली हे दाखवून देण्यास व त्यावर सोशल मीडियात उलटसुलट चर्चा करण्यातच धन्यता मानली. अशा दुःखद प्रसंगातही राजकारण होऊ लागल्याने अनेकांनी यावर संताप व्यक्त केला असून, रोज तेच तेच आरोप व एकमेकावर कुरघोड्या कुठपर्यंत चालणार, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. उत्साही समर्थकांना नेत्यांनी आवरण्याची गरज असल्याची मतेही व्यक्त केली जाऊ लागली आहेत.


बोअरवेलमध्ये पडल्याने एका कामगारांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असून प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही त्याला वाचवण्यात यश आले नाही. अशा दुर्घटना टाळण्यासाठी शेतकर्‍यांनी आपल्या शेतातील बोअरवेल व्यवस्थित झाकून ठेवण्याची गरज असून, पाणी न लागलेले बोअरवेल बुजवले पाहिजेत, यादृष्टीने सर्वांनीच विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे.
———————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!