कर्जत (प्रतिनिधी)- जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून मतदारसंघातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. तसेच महिला बचत गटांना व्यवसायासाठी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटपही करण्यात आले.
आमदार रोहित पवार यांच्या माध्यमातून मतदारसंघात नेहमीच विकासाभिमुख आणि नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. यामध्ये त्यांच्या मातोश्री आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार यांचे मोठे योगदान असते. कर्जतमध्ये नुकत्याच उभारलेल्या शारदाबाई पवार या भव्य सभागृहात ‘जागतिक महिला दिनानिमित्त त्यांनी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी मतदारसंघातील वीर मातांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रात काम करणार्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करुन त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.
शिवाय, चांगला व्यवसाय करुन यशस्वी ठरलेल्या आदर्श महिला बचत गटांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. केवळ सन्मान करण्यापुरता हा कार्यक्रम मर्यादित न ठेवता या निमित्ताने महिलांची आरोग्य तपासणीही यावेळी करण्यात आली. महिलेचे आरोग्य चांगले असेल तर ती आपल्या कुटुंबाचे आरोग्य चांगले राखील, या भावनेतून ‘कर्जत-जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून ही आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी अनेक महिलांनीही आपले मनोगत व्यक्त करुन इतर महिलांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाला कर्जत-जामखेड तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला भगिनी उपस्थित होत्या.
आमदार रोहित पवार आणि त्यांच्या मातोश्री सौ. सुनंदाताई पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात महिला बचत गटांचे जाळे निर्माण केले असून, या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणाचा कार्यक्रमच त्या निरंतर राबवत असतात. त्याचाच भाग म्हणून या कार्यक्रमाकडे पाहता येईल. केवळ बचत गट स्थापन करुन त्या थांबल्या नाहीत तर या बचत गटांना विविध व्यवसायासाठी कर्जपुरवठा उपलब्ध करुन देण्यासाठीही त्यांचा पुढाकार असतो. शिवाय, तयार उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळवून दिली जाते. त्यांनी सुरु केलेली ‘भीमथडी जत्रा’ हे महिला सक्षमीकरणाचे एक अनोखे मॉडेल म्हणून राज्यात सर्वपरिचित आहे. त्यानुसार या कार्यक्रमात महिला बचत गटांना विविध व्यवसायासाठी ३१ लाख रुपयांचे कर्जवाटप करुन खर्याअर्थाने ‘महिला दिन’ हा महिलांच्या प्रगतीशी जोडण्याचा यशस्वी प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांत महिला बचत गटांना व्यावसायिक कर्ज, बँक आणि पणन यांच्या माध्यमातून व्यवसायासाठी आणि मशिनरीसाठी ४.७२ कोटी रुपये कर्जवाटप करण्यात आले आहे.