बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जुनी पेंशन योजना (ओपीएस) लागू करण्यासाठी राज्य सरकारी, निमसरकारी कर्मचारी संघटनांच्यावतीने आज मध्यरात्रीपासून राज्यव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. या हाकेला ओ देत मेहकर तालुका ग्रामसेवक संघटनाही संपात सहभागी झाली असून, १४ मार्चपासून तालुक्यातील सर्व ग्रामसेवक संपावर जात आहेत. याबाबतचे निवेदन आज गटविकास अधिकारी (बीडीओ) यांना देण्यात आलेले आहे.
राज्यातील १ नोव्हेंबर २००५ व नंतर नोकरीस लागलेल्या सर्व सरकारी, निमसरकारी कर्मचार्यांना १९८२ व १९८४ ची जुनी पेंशन योजना पूर्ववत लागू करावी, या मागणीसाठी सर्व कर्मचारी संघटना समन्वय समितीच्या माध्यमातून १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना सदर समन्वय समितीची घटक संघटना असल्याने आमची संघटनासुध्दा या संपात सहभागी होत आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व ग्रामसेवक संपावर जात आहोत, असे निवेदन आज, १३ मार्चरोजी मेहकर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पांढरे यांना देण्यात आले आहे.
या निवेदनावर ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष दत्ता काळे, तालुका सचिव शेषराव शिंदे, रामप्रसाद शेळके, एस एन देशमुख, जी. आर. लहाने, व्ही. आर. आंधळे, एस.एम.बैलीमकर, व्ही.एन. गायकवाड, एस.एस. मवाळ, ए.एम ठाकरे यांच्यासह ६१ ग्रामसेवकांच्या सह्या आहेत. सर्व ग्रामसेवक संपावर जात असल्याने ग्रामपंचायतींचे कामकाज ठप्प पडणार आहे.
—————–