KARAJATPachhim Maharashtra

कर्जत तालुक्याला ‘दोरीत’ आणणारे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची बदली!

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत तालुक्यात आपल्या कार्यपद्धतीने वेगळी छाप निर्माण करणारे, कायद्याचा गुंडांना, आरोपींना धाक तर सर्वसामान्यांना आधार वाटण्यासाठी वातावरण निर्माण करणारे कर्जत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली आहे. त्याच्या बदलीच्या माहितीने तालुक्यात हळहळ व्यक्त होऊ लागली असून, अजून काही दिवस यादव यांची तालुक्याला गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. कर्जत येथे यादव यांच्या जागी नेवासा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय मारुती करे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत.

कर्जत तालुक्यात रस्त्यावर वाहन उभे करण्यासाठी दोरीचा वापर करून व्यवस्थेला दोरीत आणणारे अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी आपली ओळख निर्माण केली, मुलींना महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी विविध शाळांमध्ये उपक्रम राबविणारे, ठीकठिकाणी सीसीटीव्ही बसवणे, ग्राम सुरक्षा यंत्रणेचा प्रभावी वापर करणारे, गुन्हेगारांना धाकात ठेवत कायदा व सुव्यवस्था सुरळीत करणारे, पत्रकारांबरोबर सलोख्याचे संबंध ठेवत त्यांचा खुबीने वापर करणारे, पोलीस व पत्रकारांबरोबर सामजिक सलोखा क्रिकेट चषक आयोजित करणारे नारीशक्तीवर विशेषांक प्रसिद्ध करून तो घराघरात पोहचविणारे, सावकारासाठी कर्दन काळ ठरलेले व अनेक लोकांना सावकारी पाशातून मुक्त करणारे, कर्जत पोलीस स्टेशनचे रुपडे बदलणारे, सर्वसामान्य व्यक्तीला आपला फोन नंबर देऊन आपल्या चेंबरमध्ये थेट येण्याचे आवाहन करणारे अधिकारी म्हणून सर्वांना आपलेसे झालेले पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत मध्ये गेली दोन वर्ष अत्यंत चांगले काम करत कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी विशेष काम केले आहे. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर आज झालेल्या प्रशासकीय बदल्यामध्ये यादव यांची नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात प्रशासकीय बदली झाली आहे. कर्जत येथे यादव यांच्या जागी नेवासा येथे कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक विजय मारुती करे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी काढले आहेत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी कर्जत येथे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवत तालुक्यात कर्तबगार अधिकारी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याने सर्व सामान्यांना ते हवेहवेसे वाटू लागले होते त्यामुळे त्याच्या बदलीनंतर तालुक्यात कशा प्रतिक्रिया व्यक्त होतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


पत्रकारांच्या अत्यंत जवळ असलेले यादव यांनी नगर जिल्ह्यात गाजलेल्या रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे यांना हैद्राबादमध्ये जाऊन अटक करण्यात मुख्य भूमिका निभावली होती. त्याच्या वेळोवेळीच्या चांगल्या कामामुळे अनेकदा त्याचा सन्मानही झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!