खा. संजय राऊत विधिमंडळाला ‘चोरमंडळ’ म्हणाले; राजकीय वातावरण पेटले!
– खा. राऊत यांच्याविरोधात ‘हक्कभंग’; विधानसभा अध्यक्ष ८ मार्चला निर्णय देणार!
कोल्हापूर/मुंबई (प्रतिनिधी) – शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत, हे विधीमंडळ नाही तर चोरमंडळ आहे, असे म्हटल्यावरून चांगलाच राजकीय गदारोळ निर्माण झाला आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी पक्षाने याप्रश्नी खा. राऊत यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणला. प्रचंड गदारोळामुळे विधानसभा व विधान परिषदेचे कामकाज आज दिवसभराकरिता तहकूब करावे लागले. या विधानानंतर सत्ताधारी आक्रमक झाले. सत्ताधार्यांना राष्ट्रवादी काँग्रेस अन् काँग्रेसची साथ मिळाली. आता संजय राऊत यांच्या विधानाची दोन दिवसांत चौकशी करुन निर्णय देणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले.
शिवसेना (ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ, असा केल्याने आज सत्ताधारी पक्षाने विधिमंडळ डोक्यावर घेतले. आमदार अतुल भातखळकर यांच्यासह भाजपच्या आमदारांनी संजय राऊत यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी सभागृह आक्रमक भूमिका घेतली. एकापाठोपाठ एक भाजपचे आमदार संजय राऊतांवर ऊर बडवून बोलत होते. त्यांच्यावर हक्कभंग आणण्यासाठी वातावरणनिर्मिती करत होते. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राऊतांच्या वक्तव्यावर भूमिका मांडत त्यांचे विधान चुकीचेच असल्याचे सांगत, त्यांची पाठराखण करण्यास नकार दिला. सत्ताधारी-विरोधकांच्या चर्चेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ८ मार्चला राऊतांच्या हक्कभंगावर निर्णय घेऊ, असे सूचित केले.
या सर्व घडामोडीनंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते म्हणाले, की मी सर्व विधिमंडळाला चोर म्हणालो नाही तर ज्यांनी धनुष्यबाण आणि शिवसेना चोरली त्यांच्याबद्दल मी हे म्हटलो आहे. माझी बाजू न समजून घेता, माझ्या भावना न समजून घेता कारवाई करणे अयोग्य आहे, असे खा. संजय राऊत म्हणाले. दरम्यान, संजय राऊत यांनी केलेला विधानमंडळाचा अपमान खपवून घेतला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. संजय राऊत हे साधे नेते नाहीत ते राज्यसभेचे सदस्य आहेत. ज्येष्ठ सभागृहाचे सदस्य आहेत, त्यांनी हे बोलणे अयोग्य आहे. जर त्यांच्या प्रमाणे इतर ही लोक त्याची पुनरावृत्ती करतील आणि हजारो लोक विधिमंडळाबद्दल बोलतील, असे फडणवीस विधान परिषदेत म्हणाले. विधानपरिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्याची दखल घ्या, अशी विनंती भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केली.
अतुल भातखळकर आणि आशिष शेलार यांनी विशेष अधिकाराची सूचना मांडली आहे. संजय राऊत यांचे वक्तव्य विधीमंडळासाठी अपमानकारक आहे. संजय राऊत यांच्या वक्तव्याची दोन दिवसांत सखोल चौकशी करून याबाबतचा अहवाल 8 मार्च मी सादर करणार, असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटले. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी हक्कभंग दाखल करून घेण्याबाबत उद्या सकाळी 11 वाजता निर्णय घेणार असल्याचे म्हटले. दोन्ही सभागृहातील गोंधळानंतर कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
संजय राऊत यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 15 जणांची समिती स्थापन केलीय. ही समिती जाहीर देखील करण्यात आली आहे. या समितीत राहुल कुल, अतुल भातखळकर, योगेश सागर, अमित साटम, नितेश राणे, अभिमन्यू पवार, संजय शिरसाठ, दिलीप मोहिते पाटील, सदा सरवणकर, माणिकराव कोकाटे, सुनिल भूसारा, नितीन राऊत, सुनिल केदार, विनय कोरे, आशिष जैस्वाल या आमदारांचा समावेश आहे. राहुल कुल या समितीचे अध्यक्ष असणार असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या समितीकडून संजय राऊतांना उद्याच कारणे दाखवा नोटीस बजावणली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर संजय राऊत यांना पुढच्या 48 तासांत उत्तर द्यावे लागेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे या समितीत ठाकरे गटाचा एकही आमदार नाही.